
प्रे. ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा सुरू केलेले हल्ले हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. ट्रम्प यांना जगात अशांतता निर्माण करायची आहे. इराण-इस्रायल वादात ट्रम्प यांना उडी घेण्याचे कारण नव्हते. इस्रायलने गाझा पट्ट्यात केलेल्या नरसंहाराने ट्रम्प विचलित झाले नाहीत, पण इराणने होर्मुझवरील दावा घट्ट करताच ट्रम्प भडकले व एकाच वेळी हजारो ‘मिसाईल्स’ इराणवर डागली. इराणने दुबई, बहरीन, कुवेतमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले. प्रे. ट्रम्प अमेरिकेत व पंतप्रधान मोदी भारतात सत्तेवर आहेत तोपर्यंत जनतेला मानसिक शांतता लाभणार नाही. सत्य हे असेच आहे.
इराण आणि अमेरिकेतील शांतता करार हा औट घटकेचा ठरला आहे. त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, पण अमेरिकेचे हिंसक प्रे. ट्रम्प यांना त्याचे काय? ते एक व्यापारी आहेत. हिंसा आणि युद्धदेखील त्यांना व्यापारासारखे वाटते. शांतता कराराचे पालन इराणने केले नाही असे सांगत अमेरिकेने बॉम्ब हल्ले सुरू केले. शंभरच्या वर लोक मरण पावले, तर हजारावर जखमी झाले व त्या बदल्यात ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक हवे आहे. हा मूर्खपणा आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाचा भाव भडकून 84 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. त्यामुळे महागाईचा भडका उडेल. भारतासारखे देश तर महागाईच्या वणव्यात जळून जातील. इराणवर हल्ला करण्याचे कारण व्यापारीच आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण कोणाचे? अमेरिकेचे की इराणचे? हा मुद्दा आहे. युद्धापूर्वी होर्मुझवर पूर्णपणे इराणचेच नियंत्रण होते. शांतता करारात तसे मान्य झाले होते, पण प्रे. ट्रम्प यांनी तेथे अमेरिकन जहाजे पाठवून नाकेबंदी केली व तेथून जाणाऱ्या जहाजांकडून 20 टक्के टोल वसूल करण्याचे फर्मान सोडले. इराणच्या सागरी हद्दीतली ही चाचेगिरी अमान्य झाली व पुन्हा युद्ध पेटले. आता ट्रम्प यांनी 20 टक्के टोलचे फर्मान मागे घेतले. प्रे. ट्रम्प सांगतात, 20 टक्के टोलमाफीच्या बदल्यात आखाती देश अमेरिकेत मोठी गुंतवणूक करतील व त्यातून लाखोंच्या संख्येत नवे रोजगार निर्माण होतील. म्हणजेच युद्धाचा फायदा करून घेण्यासाठी प्रे. ट्रम्प धडपडत आहेत. इराणच्या सामुद्रधुनीतून लाभ मिळवण्याचा हा प्रकार योग्य नाही व शांतता करार त्यामुळे मोडला आहे. युद्धामुळे होर्मुझ पुन्हा बंद पडले. इराणी सेनेने जाहीर केले की, ‘अमेरिकेच्या या दादागिरीपुढे आम्ही झुकणार नाही. युद्ध, कपट आणि प्रे. ट्रम्प यांच्या हिंसक वागण्याने होर्मुझ कधीच उघडणार नाही. इराणची सेना इंचभरही मागे हटणार नाही.’ या युद्धाने
भारताचे नुकसान
होत आहे. होर्मुझ मार्गावरील दोन भारतीय जहाजांवर इराणने क्षेपणास्त्रे डागली. त्यात एक भारतीय इंजिनीअर मरण पावला. 25 जण जखमी झाले, पण भारत सरकारने इराणच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलावून म्हणे कडक शब्दांत समज दिली. आता कडक शब्दांत समज दिली म्हणजे काय केले? पंतप्रधान मोदी यांना युद्धप्रश्नी कायमचे मौन बाळगल्याबद्दल एखादे ‘मेडल’ प्रदान करणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींना देश-विदेशात जाऊन ‘मेडल’ मिळवण्याचा छंद जडला आहे. त्यात आणखी एका मेडलची भर पडेल. अमेरिका-इराण युद्ध हे जागतिक संकट असले तरी भारत कोठेच ताठ कण्याने उभा राहिल्याचे दिसत नाही. सर्वत्र लाचारीचेच दर्शन होत आहे. भारतीय जहाजांवरील हल्ले रोखण्यासाठी ‘विश्वगुरू’ काय करीत आहेत? हा प्रश्न जनतेला पडला आहे. रशिया-युक्रेन युद्ध मोदींनी थांबविल्याची राजकीय अफवा निवडणुकीआधी सोडणाऱ्यांना भारतीय जहाजांवरील हल्ले दिसत नाहीत. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प हे मोदी यांचे मित्र असल्याचा दावा केला जातो. हे खरे असते तर भारतीय जहाजांवर हल्ले झालेच नसते. प्रे. ट्रम्प हे जागतिक शांततेचे शत्रू आहेत व पंतप्रधान मोदी हे भारतीय शांततेचे तितकेच शत्रू आहेत. त्यामुळे इस्रायलने गाझा पट्ट्यात केलेल्या नरसंहारावर भारताने मौन बाळगले. भारताची इतकी नाचक्की नेहरू ते मनमोहन सिंग या काळात कधीच झाली नव्हती. इराण होर्मुझवर नियंत्रण ठेवण्यासाठी लढत आहे, तर भारतात अरुणाचलमार्गे चीन घुसला आहे. लडाखमध्ये त्यांनी पाय घट्ट रोवले आहेत, पण आपले सरकार हे मान्य करायला तयार नाही.
सरकारला म्हणजे भाजपला
मुंबई, प. बंगाल, आसाम, तेलंगणा वगैरे प्रांतांत घुसलेले बांगलादेशी दिसतात व त्यावर ते राजकारण करतात, पण भारतीय हद्दीत आतपर्यंत घुसलेले ‘चिनी’ सैन्य दिसत नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. जेथे राजकीय फायदा तेथेच मोदी सरकार हलते. बाकी इतर बाबतीत सगळा थंडा मामला आहे. हाच थंडा मामला इराण-अमेरिका युद्धात मरत असलेल्या भारतीय खलाशांबाबतसुद्धा आहे. होर्मुझमध्ये झालेल्या हल्ल्यात जो भारतीय तरुण नाहक मरण पावला, तो पुण्याचा इंजिनीअर हेरंब करमरकर आहे. हेरंब करमरकर हा काही भारतातर्फे इराणचे युद्ध लढण्यासाठी समुद्रावर गेला नव्हता. तो त्याची नोकरी व कर्तव्य बजावत होता, पण भारतीय जहाजांवर मिसाईल्स डागून जहाज उद्ध्वस्त केले गेले व त्यात हेरंब मरण पावला. मोदी ‘विश्वगुरू’ आहेत म्हणून इराणने भारतीय जहाजांना अभयदान दिले असे घडले नाही. इराणच्या हल्ल्यात भारतीय व्यक्ती मृत होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या चार महिन्यांत किमान दहा-बारा भारतीयांना हकनाक प्राण गमवावे लागले व पंतप्रधान मोदींनी त्या मृतांकडे ढुंकूनही पाहिले नाही. राजकारणात वावरणाऱ्या माणसांच्या संवेदना किती कठोर झाल्या आहेत ते येथे दिसते. तिकडे प्रे. ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा सुरू केलेले हल्ले हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. ट्रम्प यांना जगात अशांतता निर्माण करायची आहे. इराण-इस्रायल वादात ट्रम्प यांना उडी घेण्याचे कारण नव्हते. इस्रायलने गाझा पट्ट्यात केलेल्या नरसंहाराने ट्रम्प विचलित झाले नाहीत, पण इराणने होर्मुझवरील दावा घट्ट करताच ट्रम्प भडकले व एकाच वेळी हजारो ‘मिसाईल्स’ इराणवर डागली. इराणने दुबई, बहरीन, कुवेतमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले. प्रे. ट्रम्प अमेरिकेत व पंतप्रधान मोदी भारतात सत्तेवर आहेत तोपर्यंत जनतेला मानसिक शांतता लाभणार नाही. सत्य हे असेच आहे.































































