
चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून मयंक लोहार या २२ वर्षीय तरुणाची धारदार चाकूने निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी मध्यरात्री ठाकुर्ली-कल्याण दरम्यान धावत्या लोकलमध्ये रक्तरंजित थरार घडला. अंबरनाथ लोकलमध्ये जागेच्या वादातून एका प्रवाशाने हातातील लोखंडी कड्याने सहप्रवाशाचे डोके फोडले. या हल्ल्यात तो प्रवासी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. प्रीतेश कनोजिया असे त्याचे नाव आहे. या हाणामारीत हल्लेखोर राजू वाघे हाही जखमी झाला असून दोघांना शीव (सायन) रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना एवढी भीषण होती की, डब्यात रक्ताचा अक्षरशः सडा पडला. लोकलमध्ये किरकोळ कारणांवरून हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
टिटवाळा येथे राहणारा प्रीतेश कनोजिया (३१) हा बुधवारी रात्री उशिरा घाटकोपर येथे पेस्ट कंट्रोलचे काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याने रात्री ११ च्या सुमारास अंबरनाथकडे जाणारी स्लो लोकल पकडली. कल्याण बाजूकडील मालडब्यातून तो प्रवास करत होता. त्यावेळी डब्यात फारसे प्रवासी नव्हते. त्यामुळे तो तेथील एका सीटवर झोपला होता. रात्री ११:५२ मिनिटांनी ही लोकल डोंबिवली स्थानकात येताच राजू वाघे व त्याचा साथीदार साहिल खंदारे हे दोघे त्याच मालडब्यात चढले आणि त्यानंतर प्रीतेशसोबत त्यांचा वाद झाला.
पोलिसांसमोरच राडा
या हाणामारीची माहिती काही प्रवाशांनी पोलिसांना फोन करून दिली. त्यानंतर अंबरनाथ लोकल कल्याण रेल्वे स्थानकात दाखल होताच रेल्वे पोलीस मंगेश भोर यांनी मालडबा गाठला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस आले तरीदेखील त्यांच्यासमोर हाणामारी सुरूच होती. या हाणामारीत प्रीतेश कनोजिया गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
“या प्रकरणातील तपास झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल,” असे डोंबिवली रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा या घटनेशी संबंधित नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कुर्ला स्थानकावर बांबूची काठी भिरकावत प्रवाशाचा हैदोस
कुर्ला रेल्वे स्थानकावरही बुधवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास एका प्रवाशाने बांबूची काठी भिरकावत दहशत माजवली. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हातात लाकडी बांबू घेऊन प्रवासी जोरजोरात ओरडत पळत सुटला. त्याने रात्रीच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात हैदोस घातल्याने प्रचंड खळबळ उडाली व इतर प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी साजिद अब्दुल करीम चौधरी (४९) याला अटक केली.
विरार लोकलमध्येही तुफान हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
चर्चगेट-विरार लोकलमध्ये दोन तरुणांनी भांडणाला सुरुवात केली. काही क्षणांत वादाचा भडका उडाला आणि इतर काही प्रवासी वादात सहभागी झाल्याने तुफान हाणामारी झाली. यादरम्यान ‘मशीन काढ’ अशी धमकी दिली जात असल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. रेल्वे पोलिसांनी व्हिडीओच्या साहाय्याने पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित प्रवाशांचा शोध घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.






























































