लग्नाच्या नावाखाली 9 वर्षे आश्वासन, विवाह जुळवणाऱ्या संस्थेला ग्राहक मंचाचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवाह जुळवणाऱ्या संस्थेने एका प्राध्यापकाला लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली नऊ वर्षे आश्वासन दिल्याने ग्राहक मंचाने या संस्थेला चांगलेच फटकारले आहे. प्राध्यापकाने भरलेले नोंदणी शुल्क, मानसिक त्रासाची भरपाई आणि न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश संबंधित संस्थेला दिले.

नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकाने 2016 मध्ये ‘श्रीचक्र मॅरेज ब्युरो’ नावाच्या संस्थेची जाहिरात पाहून तिथे नोंदणी केली होती. यासाठी त्यांनी तीन हजार रुपये नोंदणी शुल्कही भरले. एजन्सीने त्यांना कासारगोड येथील एका चांगल्या मुलीचे स्थळ सुचवण्याचे आश्वासन दिले होते. पीडित प्राध्यापकाचे वृद्ध आई-वडील त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते, परंतु हा मॅरेज ब्युरो दरवर्षी केवळ ‘लवकरच चांगले स्थळ शोधू’ असे आश्वासन देत राहिला. तब्बल नऊ वर्षे हा प्रकार सुरू राहिला. याच प्रतीक्षेत ऑक्टोबर 2025 मध्ये प्राध्यापकाच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले.

ग्राहक मंचाने संबंधित संस्थेला नोंदणी शुल्काचे तीन हजार रुपये, प्राध्यापकाला झालेल्या मानसिक त्रासापोटी तीन हजार रुपये आणि खटल्याचा खर्च म्हणून दोन हजार रुपये द्यावेत, असे निर्देश दिले. ग्राहक मंचाने आदेश दिल्यापासून 30 दिवसांच्या आत ही एकूण आठ हजार रुपयांची रक्कम न दिल्यास मॅरेज ब्युरोला वार्षिक 9 टक्के व्याजासह ही रक्कम फेडावी लागेल.