किडनी द्या, नाहीतर इच्छामरणाची परवानगी; कोटामधील पाच नवमातांची राष्ट्रपतींकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोटामध्ये सिझेरियन झाल्यानंतर किडनी निकामी झालेल्या पाच मातांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्याय मागितला आहे. आम्हाला तातडीने किडनी प्रत्यारोपण करून द्या, नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी पत्रात केली आहे. रुग्णालयाच्या कथित निष्काळजीपणामुळे आणि बनावट औषधोपचारामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप या महिलांनी केला आहे.

कोटा येथील ‘न्यू मेडिकल कॉलेज’मध्ये या महिलांची प्रसूती झाली होती. तेव्हापासून त्या रुग्णालयातच मृत्यूशी झुंज देत आहेत. सध्या रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये उपचार घेत असलेल्या या पाचही मातांनी प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्रसूतीनंतर त्यांना देण्यात आलेल्या बनावट किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे त्यांच्या दोन्ही किडन्या गंभीररीत्या बाधित झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘आता डायलिसिसची भीती वाटते’

माझी पत्नी आता डायलिसिसच्या नावानेच थरथर कापते. दरवेळी डायलिसिस करताना तिला उलट्या होतात आणि रात्रभर झोप लागत नाही, असे धन्नीबाई यांचे पती मोहन लाल यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले.