
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. सकाळी रथयात्रेला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पहांडीच्या विधी वेळी भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अचानक रथांकडे धाव घेतल्याने धक्काबुक्की झाल्याने या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये एका भाविकाचा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळपासून या ठिकाणी पाऊस पडत असल्याने भाविकांची बरीच तारांबळ उडाली. यात्रा मार्गावर 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित होते. ही यात्रा मुख्य मंदिरापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिराकडे जाणार होती. हजारो भाविक ग्रँड रोडवर भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन आणि रथ ओढण्यासाठी वाट पाहत होते. याच वेळी अचानक भाविकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवली. या धक्काबुक्कीमध्ये शेकडो भाविक खाली पडले.
श्वास गुदमरल्याने एक भाविक बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. स्पेशल रेस्क्यू युनिटच्या पथकांनी रेस्क्यू मोहीम राबवून भाविकांना सुरक्षित बाहेर काढले.
200 मिलीमीटर पावसाची नोंद
पुरीमध्ये मागील 24 तासांत 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. काही ठिकाणी वाहतूककोंडी पाहायला मिळाली आहे. ओडिशा अग्निशमन सेवेने पुरीमधील पावसाचे पाणी उपसण्यासाठी 58 शक्तिशाली पंप तैनात केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिह्यातील 60 ठिकाणी पाणी उपसण्याचे काम सुरू आहे.



























































