अर्नाळ्याच्या समुद्रात चार मुले बुडाली; दोघे बेपत्ता, दोघांना वाचवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्नाळ्याच्या समुद्रात मौजमजा करण्यासाठी गेलेली चार तरुण मुले बुडाल्याची घटना आज घडली आहे. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून अन्य दोघजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध आज संध्याकाळपर्यंत घेण्यात आला. पण त्यांचा ठावठिकाणा लागू शकला नाही. शोएब खान (१८) व अयान हुसैन (१९) हे दोघे बेपत्ता असून अब्दुल शेख आणि साद खान (१६) यांना वाचवण्यात यश आले आहे. चारही जण नालासोपाऱ्याच्या पश्चिम भागात राहणारे होते. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुणीही समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी अनेक युवक व युवती येत असतात. पण सध्या पावसाळा असल्याने कुणी येऊ नये, असे प्रशासनाचे आदेश आहेत. खोल समुद्रात जाऊ नका असे फलकदेखील किनाऱ्यावर लावले आहेत. त्याशिवाय जीवरक्षक जवान आणि सुरक्षारक्षकदेखील वॉच ठेवून आहेत. बंदी असूनही आज सकाळी नालासोपाऱ्यातील चार तरुण एकाच बाईकवरून अर्नाळाच्या किनाऱ्यावर आले. समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याचा प्रयत्न केला. तिथे असलेल्या पोलीस, होमगार्ड यांनी त्यांना हटकले आणि कोणत्याही परिस्थित समुद्रात जाऊ नका, असे बजावले व गस्ती पथक पुन्हा पेट्रोलिंगसाठी पुढे गेले.

सुरक्षारक्षकाचा डोळा चुकवला आणि घात झाला पोलीस, सुरक्षारक्षकाचा डोळा चूकवून शोएब खान, अयान हुसैन, अब्दुल शेख व साद खान असे चौघेही पुन्हा समुद्रात उतरले. थोड्याच वेळाने सुरक्षारक्षकांना ओरडण्याचा आवाज आल्याने ते पुन्हा मागे फिरले आणि त्यांनी कोणताही विचार न करता थेट समुद्रात उड्या मारल्या. जिवाची बाजी लावून सुरक्षा जवानांनी अब्दुल व साद या दोन मुलांना पाण्यातून बाहेर काढून वाचवले. पण पाण्याचा प्रवाह आणि उसळणाऱ्या महाकाय लाटा यामुळे शोएब व अयान हे तरुण वाहून गेले. ही घटना समजताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. आज उशिरापर्यंत शोएब व अयान यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण ते सापडले नाहीत.

पोलीस बंदोबस्त वाढवणार

बेपत्ता तरुणांचा शोध सुरूच असल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले. दरम्यान अशी घटना घडू नये म्हणून खास काळजी घेण्यात येणार असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.