काटेवाडीत रंगले मेंढ्यांचे गोल रिंगण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> गणेश गुप्ते 

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज काटेवाडी (ता. बारामती) येथे मेंढ्यांचे गोल रिंगण रंगले. विठूनामाच्या जयघोषात रंगलेला हा अनुपम सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी वारकऱ्यांबरोबरच भाविकांनी गर्दी केली होती.

श्री संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडी येथे दुपारी साडेबारा वाजता आली असता, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते जय पवार यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन पालखी ओटा या ठिकाणी आणली. पालखी विसावल्यानंतर ग्रामस्थांनी दोन तास रांगेत उभे राहून संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर ग्रामस्थांनी पालखी काटेवाडी बसस्थानक येथे पालखीरथामध्ये ठेवली. परंपरेप्रमाणे काटेवाडी गावातील महादेव काळे, राजेंद्र मासाळ, हरि महानवर, गुलाब महानवर, विकास केसकर, ज्ञानदेव पाटोळे, पांडुरंग हाके या मेंढपाळांच्या मेंढ्यांचे पालखी सोहळ्यात गोल रिंगण रंगले. यावेळी उपस्थितांनी विठूनामाचा जयघोष केला.

रिंगणानंतर संत तुकोबांच्या पालखीने इंदापूर तालुक्यात प्रवेश करताच भवानीनगर येथील शेरपूल परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. पालखीच्या स्वागतासाठी हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संततधार पावसानेही हजेरी लावत पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सुमारे एक तास पाऊस कोसळला. मात्र, पावसाची तमा न बाळगता वारकरी अखंड हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगांच्या निनादात तल्लीन झाले.

पालखीचे भवानीनगर येथील शेरपुलावर आगमन होताच इंदापूर तालुक्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, व्हाईस चेअरमन तानाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे, वसंत जगताप, संजय मुळीक, तसेच मान्यवरांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले.

पालखी सोहळ्यादरम्यान सुरू झालेल्या पावसातही वारकरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. पावसाची पर्वा न करता विठ्ठलनामाचा अखंड गजर सुरूच राहिला.