
>> सुरेंद्र ननवरे
रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी । देह दंग सावळ्याच्या अंगणी ।। या भक्तिगीताचा प्रत्यय देणारा सोहळा चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी (दि. १६) लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दीड दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी लोणंद येथून मार्गस्थ झाला. तरडगावनजीक सायंकाळी ५ वाजता टाळ-मृदंगांच्या गजरात विठ्ठल.. विठ्ठल नामाच्या जयघोषात या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडले.
सकाळपासूनच लाखो वारकरी व भाविक तरडगाव मुक्कामी रवाना होत होते. लोणंद येथे माउलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. यावेळी गावकरी वाजतगाजत बँड लावून माउलींना नैवेद्य दाखवतात. दुपारी एक वाजता माउलींच्या रथाने चांदोबाच्या लिंबकडे प्रयाण केले. पालखी सोहळ्याचा खंडाळा तालुक्यातून फलटण तालुक्यात प्रवेश झाला. कापडगाव येथील सरहद्दीवर असलेल्या ओढ्यावर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, फलटण पंचायत समिती सभापती, सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
पालखी सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश केल्यानंतर साऱ्या विठ्ठलभक्त वारकऱ्यांना वेध लागले होते ते उभ्या रिंगणाचे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण, रिंगणाच्या उत्सुकतेने वारकऱ्यांची पावले भराभर चांदोबाच्या लिंबकडे पडत होती. रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात होता. माउलींचा रथ चांदोबाचा लिंब येथे आला असता, गर्दी असल्याने रिंगण लावताना त्रास होत असला, तरी अखेर पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी चोप आकाशाकडे धरताच सर्वत्र शांतता पसरली. कोणतीही सूचना न देता वारकऱ्यांच्या गर्दीतून हजारो वारकरी दुतर्फा झाले. अश्व धावत येण्यासाठी जागा ठेवण्यात आली.
माउली तरडगाव मुक्कामी
सोहळा माउलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. ग्रामस्थांनी पालखी रथातून खाली उतरवून माउलींच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजतगाजत तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी तरडगावात विसावला.
रिंगण सोहळ्यात वारकरी झाले तल्लीन
रिंगण लावल्यानंतर रथापुढील २७ दिंड्यांमधून माउलींच्या अश्वांचे व मानाच्या अश्वांचे आगमन झाले. ज्ञानोबा माउली-तुकाराम व पंढरीनाथच्या जयघोषात सर्व वारकरी तल्लीन झाले होते. दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता-पाहता दोन्ही अश्वांनी माउलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन अश्व मागील दिंड्यांपर्यंत गेल्यानंतर माघारी पळत आला. माउलींच्या रथाजवळ अश्व आल्यानंतर सोहळा प्रमुखांनी अश्वास पुष्पहार घालून खारीक-खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर, अश्वाने दौड घेतली. पुढे माउलींचा अश्व व मागे स्वारीचा अश्व अशी दौड पूर्ण झाली. अश्व दौड सोहळ्याच्या अग्रभागी पोहोचताच, चोपदारांनी रथावर उभे राहून हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शविले.





























































