
अयोध्येतील श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा 18 जुलैला नागपूर येथे होत आहे. या आंदोलनसाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना निंत्रीत केले आहे. संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना पत्र लिहून रामभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मोहन भागवत यांना विशेष आमंत्रित करत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
”अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या अपहारप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘शोक’ व्यक्त केला. तरीही मंदिर चोरी प्रकरणातल्या मुख्य आरोपीवर कारवाई झालेली दिसत नाही. अयोध्येतील चोरी प्रकरणाने हिंदूंच्या श्रद्धेला व विश्वासाला तडा गेला आहे. हिंदू समाजाला पुन्हा एकदा ऊर्जा देणे गरजेचे आहे. राम मंदिर चोरी प्रकरणी हिंदूंना अंधभक्तीतून जागे करण्यासाठी शिवसेनेने राज्यभरात ‘रामरक्षा’ (रामाचे संरक्षण) चळवळ सुरू केली आहे. या चळवळीचा दुसरा टप्पा नागपूर येथे होत असल्याने आपणास हे निमंत्रण देत आहोत. दि. १८ जुलै शनिवार सायंकाळी ४.३० वाजता रामनगर येथील राम मंदिरात रामभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आपणास हे विशेष निमंत्रण देत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. आपले येणे अगत्याचे आहे. काही कारणाने आपण येऊ शकला नाहीत तर आपला प्रतिनिधी पाठवा ही विनंती”, असे संजय राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.



























































