शहापूरच्या खरपत गावात आदिवासीची गळा चिरून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहापूर तालुक्यातील किन्‍हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या खरपत येथे एका आदिवासी व्यक्तीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. वामन निरगुडा असे त्याचे नाव असून पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

शाई नदीकिनारी असलेल्या खरपत या आदिवासी वाडीतील वामन निरगुडा (५२) याची त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पहाटे चार वाजता शेजारील जंगलात तो हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी गेला होता. सकाळी सव्वासहा वाजेपर्यंत तो घरी परतला नसल्याने त्याच्या पत्नीने शोधाशोध केली. त्यावेळी वामन हा हातभट्टीपासून काही अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच मृतावस्थेत आढळून आला. जुन्या जमिनीच्या वादातून किंवा आर्थिक व्यवहारातून त्याची हत्या झाली असल्याचा पोलिसांचा अंदाज असून चार संशयितांना किन्‍हवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.