
अर्नाळ्याच्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह तब्बल २९ तासांनंतर आज सापडले. सकाळी ९ वाजता अर्नाळा येथे एका मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर ९ किलोमीटर अंतरावर जुली बेट परिसरात दुसऱ्या मुलाचा मृतदेह सापडला. अयान झाकीर हुसैन मंडळ (१७) आणि शोएब शकील खान (१७) दोघेही रा. नालासोपारा अशी मृत मुलांची नावे आहेत.
मुलांच्या मृत्यूमुळे नालासोपाऱ्यात शोककळा पसरली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील डांगेवाडी परिसरात राहणारी चार मुले गुरुवारी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आली होती. मौजमजा सुरू असताना पाण्याचा आणि भरतीच्या लाटांचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. यावेळी किनार्थीवरील जीवरक्षकांनी तत्परता दाखवत यातील दोघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र उर्वरित दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले.
समुद्रात बुडून मच्छीमाराचा मृत्यू
तारापूर – डहाणू तालुक्यातील चिंचणी बारीवाडा येथील मच्छीमार संतोष बारी (३६) याचा मासेमारीदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झाला. संतोष बुधवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत घिवली गावाजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेला होता. मासेमारी सुरू असताना अचानक तोल जाऊन तो समुद्रात पडला. सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला समुद्रातून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.




























































