
अनेकदा हाणामारीच्या घटनांमध्ये चावा घेण्याचेही प्रकार घडतात. आठ वर्षांपूर्वी कांजूरमार्गमध्ये झालेल्या वादात आरोपीने चावा घेतला होता. त्या प्रकरणाचा निकाल देताना मुलुंड येथील दंडाधिकारी न्यायालयाने चावा घेण्यासाठी वापर होणाऱ्या मानवी दाताबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. निसर्गाने मानवी दात अन्न खाण्यासाठी आणि जगण्यासाठी दिले आहेत. तो मानवी शरीराचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे दातांचा समावेश ‘कापण्याचे हत्यार’ म्हणून करता येणार नाही, असा निर्णय देत न्यायालयाने आरोपीची सर्व आरोपातून मुक्तता केली.
31 मार्च 2018 रोजी कांजूरमार्ग येथे आरोपी राहुल घाडी याने दारूच्या नशेत फिर्यादी शुभम खानविलकर याच्या खांद्यावर पाठीमागून 4 ते 5 वेळा दाताने जोरात चावा घेतला होता. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी आरोपी घाडीविरोधात भादंवि कलम 323, 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या घटनेचा खटला मुलुंड येथील न्यायालयात मागील आठ वर्षे चालला. सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी एन. जी. व्यास यांनी खटल्याचा निकाल देताना आरोपी राहुल घाडी याला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले. राहुलने फिर्यादी शुभम खानविलकर याला शिवीगाळ करत चापट आणि बुक्के मारले होते. तसेच खांद्यावर दाताने जोरात चावा घेतला होता. तथापि पोलीस आरोपीविरोधातील सर्व आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
भारतीय दंड संहितेच्या कलम 324 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्यासाठी धारदार किंवा घातक हत्याराचा वापर आवश्यक असतो. चाकू, कात्री, तलवार, विळा ही कापण्याची साधने आहेत. मात्र कापण्याच्या शस्त्रांच्या यादीत दातांचा समावेश करू शकत नाही. दात हे शरीराचे अंग असल्याने कलम 324 अंतर्गत असलेला शस्त्राचा आरोप येथे टिकत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.




























































