
दिल्लीत जंतरमंतर येथे 21 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्याच्या कारवाईवरून काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशावर आंदोलकांना जबरदस्तीने हटवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
कन्हैया कुमार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले की, “पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजीनामा मागणाऱ्यांना जंतरमंतरवरून जबरदस्तीने हटवले जात आहे. जणू जंतरमंतर हे आंदोलनाचे ठिकाण नसून सरकारची खासगी बागच आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
‘चोरीच या सरकारचा संस्कार’
सरकारवर टीका करताना कन्हैया कुमार म्हणाले की, “या सरकारवर चोरीचे संस्कार झाले आहेत. निवडून आलेले आमदार पळवून हॉटेलमध्ये ठेवले जातात तर, न्याय मागणाऱ्यांना रुग्णालयात पाठवले जाते. ‘तुरुंगात जा किंवा भाजपमध्ये या’ हा खेळ लोकशाही संपवण्यासाठी खेळला जात आहे. या ‘शाह’ला तुम्ही हुकुमशाह म्हणू शकता,” असा घणाघात त्यांनी केला.
‘विद्यार्थ्यांचा आवाज थांबणार नाही’
सरकार कितीही प्रयत्न करत असले तरी विद्यार्थी आणि युवकांचा आवाज दाबता येणार नाही, असा विश्वास व्यक्त करत कन्हैया कुमार म्हणाले, “आजचा हा आवाज उद्या हुंकार बनेल. देशातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था बदलेल, सरकार आणि व्यवस्थाही बदलावी लागेल,” असे त्यांनी म्हटले.
21 दिवसांपासून उपोषण
सोनम वांगचुक हे पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण करत होते. प्रकृती खालावल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.





























































