न भूतो न भविष्यती! ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा लॉर्ड्सवर महा-धमाका; क्रिकेटच्या पंढरीत पाडला रेकॉर्ड्सचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा बेधडक फलंदाज रोहित शर्माने रविवारी (19 जुलै) क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 388 धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना, रोहितने अवघ्या 84 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने हे वादळी शतक पूर्ण केले. या ऐतिहासिक कामगिरीसह लॉर्ड्सच्या मैदानावर वनडे शतक ठोकणारा तो पहिलाच हिंदुस्थानी फलंदाज ठरला असून, त्याने सौरव गांगुलीचा (2004 मधील 90 धावा) 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

या एकाच शतकी खेळीमुळे रोहित शर्माच्या नावावर अनेक जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे. इंग्लंडच्या भूमीवरील हे त्याचे आठवे वनडे शतक असून, कोणत्याही परदेशी देशात सर्वाधिक वनडे शतके ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स (दोन्ही प्रत्येकी 7 शतके) यांना मागे टाकले आहे. इतकेच नव्हे तर, वयाच्या 39 वर्षे आणि 80 व्या दिवशी हे शतक झळकावून रोहितने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा तो सर्वात वयस्कर हिंदुस्थानी क्रिकेटपटू बनला आहे.