युक्रेनचा रशियावर भीषण ड्रोन हल्ला, ९ जणांचा मृत्यू तर ८० हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युक्रेनने रशियाच्या हद्दीत घुसून आतापर्यंतचा एक मोठा ड्रोन हल्ला चढवला आहे. या भीषण हल्ल्यात रशियातील प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग कंपनी वाइल्डबेरीजच्या दोन मोठ्या गोदामांना, एका ऑइल डेपोला आणि लष्करी लॉजिस्टिकच्या इतर महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. टीव्ही९ भारतवर्षने यासंदभात वृत्त दिले आहे.

युक्रेनच्या सीमेपासून सुमारे ३६० किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबोव प्रांतातील कोतोव्स्क येथील वाइल्डबेरीज कंपनीच्या गोदामाला सर्वातआधी लक्ष्य करण्यात आले. तांबोवचे गव्हर्नर येवगेनी पेरविशोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. यापाठोपाठ दुसरा हल्ला मॉस्कोपासून ५० किलोमीटर पूर्वेला असलेल्या इलेक्ट्रोस्टालमध्ये झाला. मॉस्को क्षेत्राचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव यांनी सांगितले की, या हल्ल्यात ६१ जण जखमी झाले असून त्यापैकी ४० जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. उपचारादरम्यान यातील एकाचा मृत्यू झाला.

याच हल्ल्यांच्या साखळीत युक्रेनी ड्रोनने नोगिंस्कमधील ऑइल डेपोवरही जोरदार हल्ला केला, ज्यामुळे तिथे भीषण आग लागली. सुरक्षेचा उपाय म्हणून जवळील प्रसूती रुग्णालय आणि निवासी इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या. एका ड्रोनचे अवशेष बालवाडीवर पडल्याने तिथेही आग लागली होती, मात्र ती वेळेत विझवण्यात आली. याशिवाय, बेलगोरोदमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या आणखी एका हल्ल्यात एकाचा मृत्यू आणि एक जण जखमी झाला आहे.