
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या टेबल टेनिसपटूंनी दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला. मुलींच्या 19 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत उर्वी चुरीने रियाना भुटावर 8-11, 11-6, 11-8, 11-1, 9-11, 11-8 अशी मात करत जेतेपदावर नाव कोरले. त्याचबरोबर अर्णव के. याने पुरुष एकेरी गटात कांस्यपदक पटकावत संकुलाच्या यशात भर घातली.
15 ते 19 जुलैदरम्यान पार पडलेल्या या राज्य मानांकन स्पर्धेत उर्वीने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर तिने शानदार पुनरागमन करत रियानाला बॅकफूटवर ढकलले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अर्णवनेही पुरुष एकेरीत दर्जेदार खेळ करत उपांत्य फेरी गाठली आणि कांस्यपदकाची कमाई केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल उर्वी आणि अर्णव यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशामागे अथक परिश्रम घेणारे प्रशिक्षक नोएल आणि सचिन यांचे मोलाचे योगदान असून, क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचेही कौतुक करण्यात येत आहे. या यशामुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने राज्याच्या टेबल टेनिसमध्ये आपला दबदबा सिद्ध केला आहे.





























































