रायगडातील 396 गावांत घंटागाडीच नाही; रस्ते, मैदानांची झाली कचराकुंडी, 809 पैकी फक्त 16 गावांतच कचरा व्यवस्थापन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्ह्यातील १ हजार ८३० महसुली गावांपैकी ३९६ गावांमध्ये घंटागाडीच नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६ ग्रामपंचायतींमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामुळे या गावांमधील रस्ते, मैदानांची अक्षरशः कचराकुंडी झाली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जिल्ह्यातील ३९६ गावांमध्ये कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी नाही. याचबरोबर ग्रामपंचायतींकडे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचाही अभाव आहे. तसेच बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये डंपिंग ग्राऊंड नसल्याने जमा करण्यात आलेला कचरा रस्त्याच्या बाजूला मैदानाच्या कोफ्ऱ्यात, मोकळ्या जागेत टाकण्यात येत आहे. यामुळे शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले असून जमा करण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, असा प्रश्न आता ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींनाही भेडसावत आहे.

आरोग्य धोक्यात

ग्रामपंचायतींकडे कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्याने जमा केलेला कचरा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. तसेच जाळण्यात आलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांमध्ये दम्याचे तसेच इतर आजार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशिक्षित कामगार पुरविण्याची गरज

रस्त्याच्या कडेला, मैदानावर व मोकळ्या जागेत टाकलेल्या कचऱ्यामुळे भविष्यात रोगराई पसरून साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रशिक्षित कामगारांची गरज आहे.