
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱयांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल असा मोठा गाजावाजा महायुती सरकारने केला होता; पण आजच्या दिवशी फक्त 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या घोषणेकडे लक्ष लागलेल्या उर्वरीत लाखो शेतकऱ्यांची यामुळे निराशा झाली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीच्या मुहूर्ताच्या यादीत केवळ 0.1 टक्क्याहून कमी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची 2 कोटी 99 लाख 37 हजार 450 रुपयांच्या कर्जमाफीची यादी जाहीर झाली आहे. कर्जमाफीच्या या घोषणेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते; पण फक्त सात जिह्यांतल्या 533 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली.
दोन दिवसांत यादी जाहीर पुढील दोन दिवसांत प्राप्तिकर विभागाकडून यादी मिळणे अपेक्षित असून त्यानंतर तातडीने कर्जमाफीची यादी जाहीर करू, अशी माहिती सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी या वेळी दिली.
आयकर खात्यावर फोडले खापर
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 533 शेतकऱयांची कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱयांची माहिती न मिळाल्यामुळे मुहूर्ताच्या यादीला ब्रेक लागल्याची कबुली या वेळी दिली.
अपात्र शेतकऱ्यांना लाभ नको
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाऊ नये यासाठी प्राप्तिकर विभागाकडे करदात्या शेतकऱ्यांची यादी पाठवली होती. मात्र या विभागाने माहिती न दिल्याने निवडक यादी जाहीर केल्याचे या वेळी सांगण्यात आले.
36 हजार कोटींची तरतूद
56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफीसाठी तरतूद केली आहे. आज कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्राप्तिकर विभागाशी संपर्कात होतो. मात्र प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी न मिळाल्याने 533 शेतकऱयांची यादी प्रसिद्ध केल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले.





























































