
गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज ओव्हरडोसमुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना दणका दिला आहे. या प्रकारच्या गुह्यांचा समाजाच्या आरोग्यावर व्यापक परिणाम होत असल्याने अशा प्रकरणांत जामीन देता येणार नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपी प्रदीप गुप्ता आणि शुभ अग्रवाल यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
11 एप्रिल रोजी गोरेगावमधील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित टेक्नो म्युझिक कॉन्सर्टदरम्यान ड्रग्ज ओव्हरडोसमुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपींना अटक केली होती. आरोपी प्रदीप गुप्ता आणि शुभ अग्रवाल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर विशेष एनडीपीएस न्यायालयाचे न्यायाधीश आर.के. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. उपलब्ध पुराव्यांवरून दोन्ही आरोपींची या गुह्यात सक्रिय आणि थेट भूमिका असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद करत न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.





























































