इंजिन निकामी झालं, महाकाय जहाज समुद्रात भरकटलं; किनाऱ्यावर धडकण्याआधीच नौदलाने केलं रेस्क्यू, पहा Video

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंदमान आणि निकोबार कमांडने दाखवलेली सतर्कता आणि तत्परतेमुळे हिंद महासागरात एक मोठी सागरी दुर्घटना टळली आहे. इंजिन निकामी झाल्यामुळे समुद्रात नियंत्रण सुटून वाहवत चाललेल्या ‘एमव्ही पायरा’ या जहाजाची हिंदुस्थानी नौदल आणि तटरक्षक दलाने अत्यंत कौशल्याने सुरक्षित सुटका केली. या विशेष सुटका मोहिमेला ऑपरेशन लान्सर असे नाव देण्यात आले होते. अंदमान आणि निकोबार कमांडने याबाबत एक्सवर पोस्ट करत माहिती दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिली आहे.

एमव्ही पायरा या जहाजाचे मुख्य इंजिन (प्रॉपल्शन) अचानक बंद पडल्यामुळे जहाजावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. हे जहाज समुद्राच्या लाटांवर अनियंत्रितपणे वाहवत ग्रेट निकोबार बेटाच्या किनाऱ्याकडे सरकत होते. जर हे जहाज किनाऱ्याला जाऊन धडकले असते तर जहाजावरील इंधनामुळे समुद्रात मोठे तेल सांडून अथांग सागरी जीवसृष्टी नष्ट होण्याचा आणि मोठी पर्यावरणीय आपत्ती ओढवण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता.

जहाजावरून मदतीचा आपत्कालीन संदेश मिळताच अंदमान आणि निकोबार कमांड त्वरित ॲक्शन मोडमध्ये आली. संदेश मिळताच हिंदुस्थानी नौदल आणि तटरक्षक दलाची युद्धनौका, तीन शक्तिशाली टग्स तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या. पथकाने अत्यंत खडतर परिस्थितीत जहाजाला ग्रेट निकोबार बेटाजवळील हिंदुस्थानीच्या सागरी हद्दीत सुरक्षितपणे नांगरले. या जहाजाची वाहवत जाण्याची क्रिया थांबली.

जहाजाला सुरक्षित केल्यानंतर नौदलाच्या एका विशेष तांत्रिक पथकाने जहाजावर जाऊन इंजिन दुरुस्तीसाठी तांत्रिक मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम हिंदुस्थानी सैन्याची सततची सतर्कता, मोहीम-सज्जता आणि सागरी सुरक्षेप्रती असलेली कटिबद्धता अधोरेखित करते. वेळेत केलेल्या या कारवाईमुळे समुद्रातील मानवी जीविताचे रक्षण तर झालेच, शिवाय एक संभाव्य पर्यावरणीय आपत्तीही पूर्णपणे टळली आहे, असे अंदमान आणि निकोबार कमांडने सांगितले.