दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहास समर्थन, अण्णा हजारेंचे नगरमध्ये मौन आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास समर्थन देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज, गुरुवारी नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ मौन धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व तरुण उपस्थित होते. यावेळी त्यांनी तिरंगा ध्वज उंचावत आंदोलनात सहभाग घेतला. आज सकाळी साडेबाराच्या सुमारास अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथून नगरला आगमन झाले. भारतमातेचे पूजन करून त्यांनी मौन व्रत स्वीकारले.

अनामप्रेम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीत गायन केले. ऍड. श्याम आसावा, ऍड. कारभारी गवळी, दीपक पापडेजा, संदीप कुसळकर, सुधीर भद्रे आदींनी आंदोलनाची पार्श्वभूमी विषद केली. दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, अशोक मासाळ, विलास पेद्राम, अशोक सब्बन, संजय झिंजे, शाकीर शेख आदींनी आंदोलनस्थळी दाखल होत हजारे यांना पाठिंबा दिला.

विविध विद्यार्थ्यांनी नीट परीक्षांर्थींच्या आत्महत्येकडे लक्ष वेधत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तत्पूर्वी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. तसेच दिल्ली येथील आंदोलनात सहभागी असणार्‍या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची चिंता व्यक्त करत विद्यार्थ्यांशी लोकशाही मार्गाने चर्चा करण्याची मागणी केली.लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे तर संवादातून प्रश्न सोडवावा. विद्यार्थी व पालक मागील 25 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत.

उत्तरदायित्व म्हणून एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही. उलट मंत्र्यांना संदेश जाईल की खात्याचा कारभार नीट केला नाही तर पदावरून दूर केले जाईल. यामुळे सरकारचा कारभार अधिक चांगला होईल, असे नमूद करत हजारे यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उपोषण स्थळावरून बळाचा वापर करून हलवण्यात आले, ते करण्यापूर्वी त्यांच्याबरोबर सरकारने कोणतीही चर्चा केली नाही. इतक्या दिवसापासून दिल्लीत उपोषण चालू असतानाही सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता सरकारला न वाटणे हे योग्य नव्हे, असेही अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.