
गुजरातमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आला असून, घरे-गाड्या पाण्याखाली गेली आहेत. पावासाचा सर्वाधिक फटका दक्षिण गुजरातला बसला आहे. सुरत, वलसाड आणि नवसारी हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले आहेत. नद्या आणि खाड्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे घरे, रस्ते आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उमरगावमध्ये तब्बल 35.67 इंच, कपराडामध्ये 29 इंच, नानपोधामध्ये 25.31 इंच आणि धरमपूर 20 इंच पावसाची नोंद झाली. सुरतमध्ये सारोली पोलीस स्टेशन परिसरातील भाग पाण्याखाली गेल्याने नागरिक घरातच अडकून पडले आहेत. सततच्या पावसामुळे सनिया हेमाड येथे खाडीच्या पाणीपातळीत सामान्य पातळीपेक्षा 10 ते 15 फुटांची वाढ झाली. यामुळे खोडियार मातेचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे राज्यातील रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. अहमदाबाद-मुंबई रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवसारी रेल्वे स्थानकावरही प्रवासी अडकून पडले आहेत, असे द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मध्य गुजरातच्या तीन जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. मध्य गुजरातमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून, 11 जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ तर 10 जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.






























































