
नीट परीक्षा घोटाळय़ाला जबाबदार असलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आधी राजीनामा घ्या मगच संसदेत चर्चा होईल, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षांनी घेतल्यामुळे आजही संसदेतील कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचे कामकाज ठप्प झाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण दिल्लीत इंटरनेट बंद करण्यात आले असून मेट्रो रेल्वेची 16 स्थानके बंद ठेवण्यात आली. त्यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
लोकसभेत आज कामकाज सुरू होताच धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. विरोधी पक्षांच्या खासदारांनी अध्यक्षांच्या समोरील जागेत येऊन घोषणा दिल्या. त्यामुळे सुरुवातीला कामकाज दुपारी बारा, त्यानंतर दोन नंतर, तीन वाजेपर्यंत व त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सरकार नीटप्रकरणी चर्चेत तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले खरे, मात्र अगोदर प्रधान यांचा राजीनामा घ्या मगच चर्चा करा, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली. अखेर दिवसभरासाठी लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
राज्यसभेतही गोंधळाची हीच मालिका कायम राहिली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृहात चर्चा होणे शक्य होणार नाही, असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.
दुकानेही बंद
दिल्लीतील अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे आंदोलकांसह सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. याशिवाय दिल्लीतील सर्व दुकाने सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. त्यानंतरही अनेक दुकाने बंदच होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली मेट्रोची 17 स्थानके आजही बंद ठेवण्यात आली होती. प्रत्येक मेट्रो स्थानकाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
वकिलांनी वाचली राज्यघटनेची प्रस्तावना
लाठीमाराचा सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी तीव्र निषेध केला आहे. आज अनेक वकील सर्वोच्च न्यायालयाबाहेर गोळा झाले. त्यांनी राज्यघटनेतील प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि लोकशाही वाचविण्याबाबत घोषणा दिल्या.
विद्यापीठाची धमकी
दिल्ली विद्यापीठाने अधिपृत ‘एक्स’ हँडलवरून एक पोस्ट टापून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना धमकी दिली असून जंतरमंतरवर न जाण्याचे बजावले आहे. जंतरमंतर येथे कोणत्याही प्रकारच्या बेकायदा सभा किंवा निदर्शनामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते. याचा भविष्यातील संधींवर वाईट परिणाम होऊ शकतो.
संसदेसमोर खासदारांची निदर्शने
प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेसमोर जोरदार निदर्शने केली. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, असे फलकही खासदारांनी यावेळी झळकावले. ‘शरम करो, शरम करो, इस्तिफा दो’ अशा घोषणा विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्या.


























































