बीएसएफ मुख्यालयात जवानाचा गोळीबार; महाराष्ट्राच्या जवानासह दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील बीएसएफ (सीमा सुरक्षा दल) सेक्टर मुख्यालयात गुरुवारी एका जवानाने गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफचे दोन जवान ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. शिवम मिश्रा असे आरोपी जवानाचे नाव आहे. अजय कुमार सिंग (51) आणि अंबादास सुरेश दुर्गू (37) अशी मृत जवानांची नावे आहेत. अंबादास दुर्गू हा जवान महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, बैष्णबनगर येथील 17 माईल सेक्टर मुख्यालयात ही घटना घडली. येथे 119 वी बटालियन आणि 71 व्या बटालियनची मुख्यालये आहेत. प्राथमिक माहितीनुसार, 119 व्या बटालियनच्या एका जवानाने 71 व्या बटालियनच्या जवानांवर गोळीबार केला. घटनेवेळी हे जवान कॅम्पमध्ये विश्रांती घेत होते. या घटनेत विकास वर्मा या जवानाला गंभीर दुखापत झाली आहे.

आरोपी शिवम मिश्रा मूळचा छत्तीसगडचा रहिवासी आहे. गोळीबारानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. गोळीबारामागचे नेमके कारण शोधण्यासाठी बीएसएफ आणि स्थानिक पोलीस स्वतंत्रपणे तपास करत आहेत. जखमी जवानाला उपचारासाठी मालदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अहवालानुसार, शिवम मिश्रा याने सुमारे वर्षभरापूर्वीही आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला होता आणि त्यानंतर त्याला बीएसएफच्या कायद्यांतर्गत शिक्षा झाली होती. ती शिक्षा काही दिवसांपूर्वीच संपली होती आणि त्याला घरी पाठवण्याची तयारी सुरू असतानाच गुरुवारी ही घटना घडली.