
दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दादर येथील शिवतीर्थावर तिरंगा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत उपस्थित होते. यावेळी अमित ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी तरुणाईशी संवाद साधला. नवतरुणांनी सरकारला बॅकफूटवर टाकलंय असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत पोहचतेय. आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालो आहोत. त्यामुळे काही करायची गरज नाही. आज आम्ही फक्त इथे आलोय कारण तुम्हाला कुणी हात लावणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही. तुम्ही जे करताय त्याने देश पेटून उठलाय, सरकार बॅकफूटवर गेलंय आणि अशा दहशतवादी सरकारला बॅकफूटवर टाकणारे आपले तरुण-तरुणी आहेत. त्यामुळे इकडे जास्त बोलायला आलो नाही, मी फक्त तुम्हाला अनुभवायला आलोय, असे अमित ठाकरे तरुणाईशी संवाद साधताना बोलत होते. तसेच आंदोलनात सहभागी तरुणाईला आपल्या भावना व्यक्त करायच्या असल्यास स्टेजवर येण्याचे आवाहन केले.


























































