
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तानसा, मोडकसागर धरणानंतर आता भातसा धरणही ओव्हरफ्लो झाले. आज दुपारी एक वाजता विधिवत पूजा करून नदीला साडी-चोळी अर्पण करून धरणाचे पाचही वक्र दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या ८६.७६५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भातसा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज आषाढी एकादशीच्या दिवशीच धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी चिंता मिटली असून यंदा ‘पंढरीचा विठुरायाच मुंबईकरांना पावला’ आहे.
भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आजही मुसळधार पाऊस सुरू असून आज दिवसभरात १५९ मिमी तर गेल्या महिनाभरात एकूण १,८७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात मोठ्या वेगाने पाण्याची आवक सुरू झाली. आज सकाळी धरणाची पाणीपातळी १३७.३८ मीटर होती. पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. भातसा धरणाची पाण्याची पातळी १४२ मीटर असून सध्या धरणात ८१७.८८७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा तसेच ८५१.८८७ दलघमी एकूण पाणीसाठा आहे. पाण्याचा ओघ वाढत असल्याने धरणाचे पाचही वक्र दरवाजे उघडून ८६.७६५ क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
प्रशासनाचा सुटकेचा निश्वास
शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडकसागर ही धरणे यापूर्वीच भरून वाहू लागली आहेत. त्यानंतर आता भातसा धरणही ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाणीसाठ्याबाबत निर्माण झालेली चिंता गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे दूर झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.
भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शहापूर तालुक्यातील नदीपात्रा लगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात नागरिकांनी जाऊ नये तसेच नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी. – संदीप भालेराव, कार्यकारी अभियंता



























































