
झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. वेळेवर प्रसूती रजा न मिळाल्याने गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत काम करावे लागल्याने शाळेच्या आवारातच प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित शिक्षिका भारती पांडे या तरहासी येथील सिलदालिया प्लस-2 हायस्कूलमध्ये कार्यरत असून, सध्या त्या चैनपूर येथील कस्तुरबा गांधी निवासी शाळेत प्रतिनियुक्तीवर आहेत.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती पांडे यांनी 3 जुलै रोजी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या (डीईओ) कार्यालयात प्रसूती रजेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ही रजा मंजूर करण्याच्या बदल्यात 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने रजा नाकारण्यात आली, ज्यामुळे गरोदरपणाच्या अत्यंत कठीण टप्प्यातही भारती यांना शाळा आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या. रजा न मिळाल्यामुळे त्या नियमितपणे शाळेत जात असतानाच, अचानक शाळेच्या आवारात त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या अमानुष कारभारावर आणि मानसिक छळावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
याप्रकरणी पीडित शिक्षिकेचे पती आणि पोलीस कर्मचारी असलेल्या मुकेश कुमार तिवारी यांनी पलामू शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी संदीप कुमार आणि त्यांच्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी पलामूच्या उपायुक्तांकडे (डीसी) तक्रार करूनही आणि त्यांनी आवश्यक सूचना देऊनही वेळेवर रजा मंजूर केली गेली नाही, असा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. जर वेळेवर रजा मिळाली असती, तर बाळ वाचू शकले असते, अशी संतप्त भावना कुटुंबाने व्यक्त केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पलामूचे उपायुक्त दिलीप प्रताप सिंह शेखावत यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. प्राथमिक तपासात शिक्षिकेने बाल संगोपन रजेसाठी अर्ज केला होता आणि त्यात प्रसूती रजेचा स्पष्ट उल्लेख नव्हता, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, लाच मागितल्याच्या आरोपांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात संबंधित लिपिकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. चौकशीत डीईओ दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे.























































