
नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचारानंतर आता शेजारील सप्तरी जिल्ह्यातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळ प्रशासनाने शुक्रवारी हिंदुस्थान सीमेजवळील सप्तरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ काही गटांनी निदर्शने सुरू केल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून राजबिराज नगरपालिकेच्या काही भागांत सकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. PTI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
नेपाळमधील तराई भागात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, प्रशासनाने आतापर्यंत तब्बल चार जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. गेल्या आठवड्यात रविवारी दोन धार्मिक समुदायांच्या कार्यक्रमांदरम्यान लाऊडस्पीकर आणि धार्मिक ध्वज लावण्यावरून वाद झाला होता. या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर नंतर मोठ्या हिंसाचारात झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. या सर्व घटनांमध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, सुरक्षा रक्षकांसह अनेक जण जखमी झाले आहेत.
हा हिंसाचार आता शेजारील मधेश आणि कोशी प्रांतातही पसरला आहे. गुरुवारी सिरहा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. तसेच, सुनसरी येथील हिंसाचारात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा कोशी प्रांतात मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सप्तरीसोबतच सुनसरी, धनुषा आणि सिरहा या भारत सीमेजवळील जिल्ह्यांमध्येही आधीपासूनच संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.




























































