Nagar News – पाकिस्तानी ‘गोरी’ क्रीमचं संगमनेर कनेक्शन! गोल्डन मार्केटवर एफडीएचा छापा; दुकानदार ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमेपलीकडील पाकिस्तानात तयार होणारी व मानवी आरोग्यास घातक मानली जाणारी ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ थेट संगमनेरच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारी गोल्डन मार्केटमधील दुकानावर धाड टाकत १२ हजार ९०० रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला. या प्रकरणी संबंधित दुकानदाराला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औषध निरीक्षक सोमनाथ मुळे (अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीनुसार शाहीद रियाज शेख (वय ३६, संगमनेर) यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला. तपासणी दरम्यान पाकिस्तान इन पाकिस्तान पाकिस्तान स्टॅंडर्ड असा उल्लेख असलेल्या ‘गोरी ब्युटी क्रीम’ व ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ चा मोठा साठा आढळून आला. यामध्ये ७,७०० रुपये, २,२०० रुपये आणि २,२०० रुपये किमतीचे विविध बॉक्स जप्त करण्यात आले. हिंदुस्थानात विक्रीसाठी आवश्यक परवानगी नसतानाही ही उत्पादने ग्राहकांना विक्रीसाठी ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या सौंदर्यप्रसाधनांतील काही घटक त्वचा, मूत्रपिंड (किडनी) तसेच मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ बेकायदा विक्रीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पाकिस्तानातील हे उत्पादन संगमनेरपर्यंत कोणत्या मार्गाने पोहोचले, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे आणि अन्य ठिकाणीही अशाच प्रकारे विक्री सुरू आहे का, याचा आता पोलीस सखोल तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, विजय खुळे, बाबासाहेब सातपुते, विजय आगलावे, सागर नागरे यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने केली असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कसून तपास सुरू आहे.