खोपोलीत ४० फूट खोल दरीत तरुण कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू झाला की अनेकांना धबधबे तसेच पाण्याच्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरत नाही. मात्र निष्काळजीपणा केल्यानंतर अनेकदा पावसाळी थ्रिलिंग जीवावर बेतते. अशीच एक घटना खोपोलीत घडली आहे. बंदी असतानाही ठाण्यातील चार तरुण झाडाझुडपांतून छुप्या मार्गाने केपी धबधब्यावर गेले खरे, मात्र उतरत असताना निसरड्या रस्त्यावरून एका तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट ४० फूट खोल दरीत कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला. अभिषेक कुसवाहा असे मृताचे नाव आहे.

 

ठाण्यात राहणारे साहिल हरिजन, देवा गायधनकर, साहिल सावंत आणि अभिषेक कुसवाहा हे चार तरुण खोपोलीतील केपी वॉटरफॉ ल येथे फिरण्यासाठी गेले होते. विकेंडचा आनंद लुटून घरी परतत असताना अभिषेकचा निसरड्या रस्त्यावरून पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. त्याच्या मित्रांनी शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही.

 

अखेर त्यांनी याची माहिती झेनिथ ठाकूरवाडी येथील स्थानिकांना दिली. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस, हेल्प फाऊंडेशनचे सदस्य आणि स्थानिक बचाव पथकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. अंधार, मोठमोठे दगड आणि झाडाझुडपांमुळे शोधमोहिमेत अडचणी येत होत्या. परंतु आज पहाटेच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह सापडला.