
झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात माफिया आणि माजी खासदार अतीक अहमदच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अबान अहमद असे त्याचे नाव असून अबानच्या एका सहकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. कारमधील इतर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अबान अहमद त्याच्या मित्रांसोबत झाशी तुरुंगामध्ये असलेला त्याचा भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी गेला होता. भावाला भेटून परत येताना कानपूर-झाशी महामार्गावर पूंछ पोलीस ठाण्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण पाचजण होते.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी अबान अहमद आणि सोनू यांना मृत्यू घोषित केले. तसेच उमर अहमद, मोहम्मद जैद आणि असलम हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
कारसमोर अचानक एक जनावर आल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर आदळली, अशी माहिती उपस्थितांनी दिली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या अपघाताच्या कारणांची अधिकृत माहिती दिलेली नाही. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
माफिया अतीक अहमदला पाच मुले होती. त्यापैकी असद अहमद एप्रिल २०२३ मध्ये पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता तर, अली अहमद सध्या झाशी तुरुंगात आहे. रस्ते अपघातात अबान अहमदचाही मृत्यू झाला आहे. अतीकची इतर दोन मुले सध्या शालेय शिक्षण घेत आहेत. माफिया अतीक अहमदचीही एप्रिल 2023 मध्ये हत्या करण्यात आली होती.




























































