पालघर आयटीआय विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक व्हिंटेज कार; आधुनिक तंत्रज्ञानाला दिली पारंपरिक वारशाची जोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक व्हिंटेज कार तयार केली आहे. या विद्यार्थ्यांनी आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाला पारंपरिक वारशाची जोड देऊन हा नावीन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पालघर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम करीत असतात. सध्या देशभर इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. नामांकित कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. पालघर आयटीआयमधील विद्यार्थ्यांनीही इलेक्ट्रिक व्हिंटेज कार तयार केली आहे. हा उपक्रम संस्थेचे निदेशक किशोर आहेर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साकारण्यात आला आहे.

  • देशभरात इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता जुन्या काळातील आकर्षक व्हिंटेज कारच्या रूपाला आधुनिक इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची अभिनव कल्पना या प्रकल्पामागे आहे.
  • कारला जुन्या काळातील हेरिटेज लूक देण्यात आला असून त्याचवेळी पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनोखा मिलाफ या प्रकल्पातून पाहायला मिळतो.