शाळेच्या छताचा काही भाग कोसळून दोन शिक्षकांसह १३ विद्यार्थी जखमी,बाबलाद येथील जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेतील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद कन्नड शाळा, बाबलाद या शाळेच्या छताचा काही भाग कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले.

शिक्षक रमेश शिवमूर्ती, भीमण्णा गवळी; विद्यार्थी अथर्व मड्डी, श्रीमंत मणुरे, प्रज्वल न्हावी, लक्ष्मीपुत्र खानापुरे, शरणबसप्पा खानापुरे, प्रशांत चांभार, दर्शन चव्हाण, प्रज्वल बोलदे, अनुष्का मड्डी, सिद्धार्थ पुजारी, विशाल अचगोंड, मानसी खानापुरे, सिद्धार्थ कलशेट्टी अशी जखमी शिक्षक व विद्यार्थ्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, मौजे बाबलाद येथे जिल्हा परिषदेची कन्नड शाळा आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी तिची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेत आले आणि शाळेतील व्हरांड्यात थांबून १५ ऑगस्टच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाची तयारी करत होते. या वेळी अचानक जीर्ण झालेल्या इमारतीच्या छताचा काही भाग व्हरांड्यात उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर कोसळला. त्यात १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच बाबलाद गावातील ग्रामस्थ शाळेकडे धावले. ही कन्नड शाळा जुनी असून, इमारत जीर्ण झालेली आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यातील सात विद्यार्थी आणि एका शिक्षकाला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. उर्वरित विद्यार्थी आणि एका शिक्षकावर मैंदर्गी व दुधनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर मंजुनाथ पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार केले.

या घटनेचे वृत्त कळताच उपसभापती सागर कल्याणशेट्टी, गटविकास अधिकारी शंकर कवतिके, गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समिती सदस्या संगीता बिराजदार, पंचायत समिती सदस्य भीमण्णा बिराजदार, माजी सरपंच राजकुमार लवगावे, महांतेश दर्शनाळ, रमेश रोडगे, बसवराज पाटील, चंद्रकांत देगाव, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवानंद बिराजदार आणि इरण्णा दाभाडे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

बाबलाद ग्रामस्थांनी जीर्ण झालेली कन्नड शाळेची इमारत पूर्णपणे नवीन तयार करून मिळावी, अशी मागणी केली. केवळ सुदैवाने विद्यार्थी वाचले; अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.