
शिवाजी विद्यापीठात एका राजकीय पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेला सोबत घेऊन ‘गोलमेज परिषदे’स परवानगी कोणी दिली, याचा जाब आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांना विचारण्यात आला. तसेच शिवाजी विद्यापीठात आंदोलन व निवेदन देण्याबाबत हुकूमशाही पद्धतीने काढलेले नियम तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांची कमी होत जाणारी उपस्थिती ही शिक्षण क्षेत्रातील एक नवीन आणि मोठी समस्या बनली आहे. यापूर्वीही अशा अनेक आव्हानांवर शिवाजी विद्यापीठाने यशस्वीरीत्या मात केली असून, यासाठी आपले विद्यापीठ पूर्णपणे सक्षम आहे. असे असतानाही, या समस्येवर एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संलग्न विद्यार्थी संघटनेचा आधार घेऊन शिवाजी विद्यापीठात ‘गोलमेज परिषदे’च्या नावाखाली नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत शिवाजी विद्यापीठाच्या चिन्हाशेजारी (लोगो) ‘त्या’ राजकीय विद्यार्थी संघटनेचा लोगो छापून त्यास राजकीय स्वरूप देण्यात आले. ही अत्यंत गंभीर बाब असून, या प्रकारास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह अनेक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
तसेच, ‘नीट’ (NEET) परीक्षांमधील पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी निवेदन देण्यासाठी आले असता, प्र-कुलगुरूंनी निवेदन स्वीकारलेच नाही; उलट विद्यापीठात कोणतेही आंदोलन किंवा निवेदन कुलगुरूंच्या पूर्वपरवानगीशिवाय दिले जाणार नाही, असे अलोकतांत्रिक फर्मान काढले. या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध नोंदवत हे नियम तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख विराज पाटील, जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































































