134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदीसह चार कोटींचा मुद्देमाल केला परत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तपासात जप्त केलेल्या मुद्देमालाचे शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमानुसार हस्तांतरण करण्यासाठी घेण्यात आलेला ‘मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम’ हा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारा ठरला, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी केले.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. खरे क्लब हाऊसच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रंजनकुमार शर्मा म्हणाले, “गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा वेळेत छडा लावणे या दोन्ही बाबींसाठी पोलीस दल कर्तव्यदक्ष आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. आज १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि २४,५०० किलो बेदाणा असा जवळपास ४ कोटी रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास निश्चितच वृद्धिंगत होईल. नागरिकांनीही दक्ष राहून गुन्हा घडल्यास ११२ या क्रमांकावर तक्रार करावी; तसेच तपासासाठी सहकार्य व पाठपुरावा करावा.”

पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, “गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि गुन्ह्यांचे अन्वेषण करणे हे पोलिसांचे प्रमुख काम असले, तरी गुन्ह्यातील संपत्ती संबंधितांना परत केली तरच पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळतो. दागिने हा केवळ ऐवज नसून, संबंधितांची भावनिक गुंतवणूक त्यात झालेली असते.” अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अचूक अभिलेख आणि नियमित पडताळणी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुद्देमाल व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील आहे. सुनील गुरव यांनी सूत्रसंचालन केले, तर मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी आभार मानले.

पोलिसांप्रती कृतज्ञता

कवठेमहांकाळ येथील डॉ. म्हेत्रे यांच्या घरात १४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘स्पेशल २६’ या चित्रपटाच्या धर्तीवर दरोड्याची घटना घडली होती. त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या दोन ते तीन दिवसांत मुद्देमाल हस्तगत केला. आज तो मुद्देमाल डॉ. म्हेत्रे यांना परत करण्यात आला. याबद्दल त्यांनी संपूर्ण पोलीस पथकाचे मनापासून आभार मानले.