
नजिकच्या काळात मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी बनणार आहे. मुंबईच्या उपनगरी रेल्वे मार्गासाठी 238 नवीन एसी लोकल गाड्यांची निर्मिती रेल्वेच्याच तीन कारखान्यांमध्ये करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. नव्या एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत लवकर दाखल करण्याच्या हेतूने हे पाऊल उचलण्यात आले आहे. समांतर उत्पादन धोरणामुळे 238 एसी लोकलपैकी पहिली लोकल 2027 मध्येच उपलब्ध होणार आहे.
संपूर्ण 238 एसी लोकलचा ताफा 2030 पर्यंत प्राप्त करण्याचे उद्दीष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. उपनगरी रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवीन कॉरिडॉर, अतिरिक्त रेल्वे मार्गिका, 15 डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार तसेच यार्ड पुनर्रचनेसारख्या अन्य क्षमतावाढीच्या कामांसाठी सुमारे 22 हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे. या पायाभूत सुविधा विस्तारासोबतच सरकारने मुंबईसाठी 238 अतिरिक्त एसी लोकलच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली.
नव्या एसी लोकल गाड्यांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र खासगी निविदेच्या माध्यमातून गाड्यांची पुरवठा प्रक्रिया सुरु होण्यासाठी तीन वर्षे लागली असती आणि पहिला रेक 2030 पर्यंत उपलब्ध झाला असता. संभाव्य विलंब टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण 238 एसी लोकलची निर्मिती रेल्वेच्याच तीन कारखान्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई, कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी आणि रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरीमध्ये एकाचवेळी सर्व 238 एसी लोकल गाड्यांची निर्मिती केली जाणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या महत्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. मुंबईची लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आणि शहराच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एसी लोकल प्रवासाचे फायदे मुंबईकरांपर्यंत लक्षणीयरित्या लवकर पोहोचावेत, यादृष्टीने त्वरित उत्पादन धोरणावर भर दिला आहे, असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष विलास वाडेकर यांनी स्पष्ट केले.




























































