
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी केवळ व्यायाम करणे पुरेसे नाही, तर योग्य आहार, पुरेसे पाणी आणि स्वच्छतेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वाढत्या वयाबरोबर स्नायूंची ताकद आणि मास कमी होऊ शकतो. त्याचबरोबर पावसाळ्यात घरात वाढणारी आर्द्रता जंतू आणि बुरशीसाठी पोषक वातावरण तयार करू शकते. त्यामुळे आहारापासून घराच्या स्वच्छतेपर्यंत काही साध्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.
मसल्स मजबूत ठेवण्यासाठी आहारात काय असावे?
शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी स्नायूंची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. स्नायूंची वाढ आणि दुरुस्तीसाठी प्रथिने म्हणजेच प्रोटीन महत्त्वाची भूमिका बजावतात.
आहारात अंडी, चिकन, मासे, दूध, दही आणि पनीर यांचा समावेश करता येतो. शाकाहारी व्यक्तींनी डाळी, राजमा, चणे, सोयाबीन आणि टोफू यांसारखे पदार्थ खाऊ शकतात. बदाम, शेंगदाणे आणि इतर कडधान्यांमधून प्रोटीनसोबत आरोग्यदायी चरबीही मिळू शकते.
याशिवाय ओट्स आणि क्विनोआसारखी संपूर्ण धान्ये, तसेच विविध फळे आणि भाज्या आहारात असणे आवश्यक आहे. केवळ एका पदार्थावर अवलंबून न राहता विविध पोषक पदार्थांचा संतुलित आहार घेणे अधिक फायदेशीर ठरते.
केवळ प्रोटीन नाही, व्यायामही आवश्यक
फक्त प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने स्नायू मजबूत होत नाहीत. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. वेट लिफ्टिंग, स्क्वॅट्स, पुश-अप्स, लंजेस आणि रेजिस्टन्स बँडच्या व्यायामांचा यात समावेश होतो.
नियमित चालणे, सायकलिंग आणि पोहणे यामुळेही शरीर सक्रिय ठेवण्यास मदत होते. मात्र, बराच काळ व्यायाम केला नसेल तर सुरुवात हलक्या व्यायामापासून करून हळूहळू तीव्रता वाढवणे योग्य ठरते. पुरेशी झोप आणि व्यायामानंतर शरीराला विश्रांती देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.





























































