100 मानवी सांगाडे अन् एक रहस्यमय भूतकाळ, कच्छच्या सीमेजवळ उघडला मध्ययुगीन इतिहास!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील एका निर्जन भागात पुरातत्व संशोधकांना मध्ययुगीन काळातील एक प्राचीन वस्ती सापडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी गस्तीदरम्यान ही जागा शोधून काढल्याची माहिती आहे. या संशोधनामुळे ऐतिहासिक काळातील अनेक महत्त्वाची रहस्ये समोर आली आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या संशोधनासाठी क्रांतीगुरू श्यामजी कृष्ण वर्मा कच्छ विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने एकत्र येऊन काम सुरू केले आहे. या ठिकाणाला ‘बरबादी गाव’ असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ही वस्ती 11 व्या ते 14 व्या शतकादरम्यान, म्हणजेच ‘सोमरा’ काळामध्ये अस्तित्वात होती.

उत्खननादरम्यान येथे मोठ्या विटांच्या वास्तू, मातीची भांडी, दिवे, तांब्याची नाणी, उंटाची मूर्ती आणि भात कापणीची अवजारे सापडली आहेत. तसेच येथे सुमारे 100 मानवी सांगाड्यांची एक स्मशानभूमीही आढळली आहे. संशोधकांच्या मते, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे हे अवशेष जमिनीत गाडले गेले असावेत.

आज हा परिसर जरी निर्जीव किंवा ओसाड वाटत असला तरी एके काळी हा भाग अरबी समुद्राशी जोडलेला समृद्ध व्यापारी आणि शेतीचा केंद्रबिंदू असावा, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.