
वरळी येथील २५,५४३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा सेंच्युरी मिलचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी एका खासगी कंपनीला भाड्याने देण्यात येणार आहे. त्यासाठी ‘पेडर रिएल्टी’ या कंपनीसोबत १३५१ कोटी रुपयांचा करार केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आज महापालिकेच्या सुधार समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला असता प्रस्तावातील त्रुटींवर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. “सेंच्युरी मिल भूखंडाच्या प्रस्तावामागे अदृश्य शक्तींचा हात असून सत्ताधाऱ्यांनी मुंबई विकायला काढली आहे,” असा घणाघाती आरोप शिवसेना आणि काँग्रेसने केला. त्यानंतर बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी प्रस्ताव मंजूर करताच संतप्त विरोधकांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून निषेध नोंदवला.
सेंच्युरी मिलच्या या भूखंडावरील हक्क मिळवण्यासाठी महापालिकेने अनेक दशके कायदेशीर लढा दिला होता. हा भूखंड पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर तो पुनर्विकासासाठी खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे. भूखंडावरील १०,९२९ चौरस मीटर क्षेत्रफळाचे ‘मनोरंजन मैदान’ (RG) हे आरक्षण बदलण्यात येणार आहे. तसेच तिथल्या रहिवाशांची पात्रता निश्चित न करता आणि त्यांच्या मागण्या ऐकून न घेताच हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याचा आरोप करत शिवसेनेने सुधार समितीत तीव्र आक्षेप नोंदवला.
“हा प्रस्ताव एका विशिष्ट कंपनीसाठीच आणला गेला असून यामागे अदृश्य शक्ती कार्यरत आहे. ‘पेडर रिएल्टी’ ही जिंदाल समुहाची कंपनी आहे. या कंपनीला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणचा भूखंड अत्यंत स्वस्तात देऊन एका प्रकारे लॉटरीच लावून दिली आहे. एका विशिष्ट व्यक्तीलाच टेंडर मिळावे असा अट्टाहास कशासाठी? या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा प्रस्ताव त्वरित रद्द करण्यात यावा,” अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली.
प्रशासनाचा ‘रात्रीस खेळ चाले’ – विशाखा राऊत
“अनेक चांगल्या कंपन्यांना डावलून एका विशिष्ट कंपनीलाच पात्र कसे ठरवले गेले? आधीच्या महापालिका आयुक्तांनी निवृत्त होण्याच्या आदल्या रात्री या प्रस्तावावर घाईघाईने स्वाक्षऱ्या केल्या. त्यांचा कारभार ‘रात्रीस खेळ चाले’ असाच सुरू होता. चार रात्री महापालिकेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग तिथे उपस्थित राहून अनेक संशयास्पद प्रस्ताव मंजूर करण्यात आले, हा प्रस्तावही त्यातलाच एक आहे. प्रशासनाला एवढी घाई का होती आणि यामागे नेमके कोण आहे?” असा संतप्त सवाल शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी उपस्थित केला. तसेच “पालिकेशी संबंधित मालकीच्या जागा इतरांच्या घशात कशाला घालायच्या? आजवर अशा पुनर्विकासातून पालिकेला किती घरे मिळाली, याचा लेखाजोखा प्रशासनाने द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्याचा डाव – अशरफ आझमी
“सेंच्युरी मिलच्या भूखंडाच्या लिलावात पात्र ठरलेल्या ‘पेडर रिएल्टी’ कंपनीचा ५१ टक्के हिस्सा ‘जिंदाल स्टील’ने खरेदी केला आहे. नवीन जिंदाल हे भाजपचे खासदार आहेत,” हा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी निदर्शनास आणून दिला. “या भाडेकरारामुळे महापालिकेचे हजारो कोटींचे नुकसान होत असून, तेथील मराठी माणसाला मुंबईबाहेर हाकलण्याचा हा डाव आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करून पुनर्निविदा (Re-tender) काढण्यात यावी,” अशी सूचना त्यांनी केली. “इतक्या मोठ्या प्रमाणावर मुंबईतील भूखंड विकले जाण्याचा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता,” असा तीव्र संताप काँग्रेस नगरसेविका मेहर हैदर यांनी व्यक्त केला.

































































