अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या! पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prithviraj-chavan

“जंतर-मंतरवर गोळीबाराचा आदेश कुणीतरी दिला असेल ना? तुम्ही सांगा ना, मी नाही दिला! मला माहिती नाही कुणी केले? मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात; म्हणूनच तुम्ही राजीनामा दिला पाहिजे,” अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

“संसदेच्या अधिवेशन काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात आलेच नाहीत. सभागृहाला सामोरे जायला तुम्ही घाबरता हेच यातून सिद्ध होते. मग पळपुटे कोण आहे?” असा सवाल करत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमचे म्हणणे एवढेच आहे की, तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्या. उत्तरांनी आमचे समाधान झाले तर आम्ही काही म्हणणार नाही. परंतु तुम्ही हे करू शकत नाही. यावरून तुम्ही सभागृहाला सामोरे जायला घाबरता हेच स्पष्ट होते.”

“अमित शाह हे आपल्या कार्यालयात येऊन बसत होते, मात्र संसदेत येत नव्हते. तुम्ही सभागृहात न येणे हा संविधानाचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे आणि देशातील जनतेचा अपमान आहे. विरोधकांच्या डोक्यावर खापर फोडू नका. जंतर-मंतरवर आंदोलकांवर गोळीबार झाला की नाही? पेलेट गन वापरल्या की नाही? एका मुलाचा डोळा गेला की नाही? बिहारमध्ये एके-४७ वापरली गेली; कुणीतरी आदेश दिला असेल ना?” असा थेट सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मोदी सरकारची घटका भरली “मोदी सरकारला २०२९ च्या निवडणुकीची खात्री नाही, म्हणूनच २/३ बहुमतासाठी राजकीय पक्ष फोडले जात आहेत. मला पूर्ण खात्री आहे की २०२९ मध्ये सत्ताबदल होणारच! मात्र, यासाठी विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे असून केंद्रातील मोदी सरकारची घटका भरली आहे,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.