
इंडोनेशियाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने इंडोनेशियाची धरती हादरून गेली. या भूकंपामुळे घरांची पडझड झाली असून पाच जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून लोकांनी घराबाहेर धाव घेतली. या भूकंपानंतर प्रशासनाने तातडीने त्सुनामीचा इशारा दिला आहे. समुद्रकिनाऱ्यांवर 1 मीटरपेक्षा कमी उंचीच्या लहान त्सुनामीच्या लाटा उसळल्याचे दिसले, मात्र काही तासानंतर हा धोका टळल्याने त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला.
इंडोनेशियाच्या बीएमकेजी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पहिला शक्तिशाली भूकंप पहाटे 4.58 वाजता झाला. या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 15 किलोमीटर खोलीवर होते. मुख्य भूकंपानंतर काही वेळातच अनेक सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे आफ्टरशॉक्स नोंदवले गेले. नागेकेओ आणि बिमा यांसारख्या प्रदेशात सुमारे एक मिनिटापेक्षा जास्त काळ भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, अशी माहिती इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीचे प्रवक्ते डोडी युलिओव्हा यांनी दिली.
BUILDINGS SWAY VIOLENTLY and CRUMBLE as 7.7 MONSTER QUAKE ROCKS INDONESIA https://t.co/qMl0QaNyzT pic.twitter.com/fvePye9AJo
— RT (@RT_com) August 14, 2026
पूर्व इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावरील सिकका रेजन्सीचे मुख्य शहर असलेल्या माउमेरे येथील बंदरावर एका इमारतीचा काही भाग कोसळला. यानंतर धुळीचे लोट उठताना आणि नागरिक किंचाळत रस्त्यावर धावताना दिसून आले. तर या भूकंपामुळे पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील एंडे जिल्ह्यातील एका रुग्णालयातून सर्व रुग्णांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
भूकंपाची तीव्रता पाहता बीएमकेजीने सुरुवातीला किनारपट्टीच्या प्रदेशांसाठी त्सुनामीचा सतर्कतेचा इशारा जारी केला होता. काही भागांत लहान लाटा उसळल्या, परंतु परिस्थिती नियंत्रणात असल्याने नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. सध्या स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके प्रभावित क्षेत्रांवर बारकाईने लक्ष ठेवून असून नुकसानीचा व जीवितहानीचा सविस्तर पंचनामा केला जात आहे.































































