रंगयात्रा – अ‍ॅन अ‍ॅलेगरी ऑफ प्रुडन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंत पाटील

इटलीच्या व्हेनिस शहरातल्या महान चित्रकार टिशिअन याने आयुष्याच्या उत्तरार्धात काढलेले हे चित्र, आयुष्यातील अनुभवांना अधोरेखीत करीत जणू जगण्याचं मर्मच उलगडते.

कल्पना करा की, आपण सोबत दिसणारं चित्र पहिल्यांदाच पाहतोय. त्यात तीन चेहरे आहेत, एक म्हातारा, एक मध्यमवयीन आणि एक तरुण. त्यांच्या खालोखाल आणखी तीन चेहरे, एक लांडगा, एक सिंह आणि एक कुत्रा. ना कुठली कथा, ना कुठला संदर्भ थेट दिलेला. फक्त सहा चेहरे, वेगवेगळ्या दिशांना बघणारे. पहिल्यांदा बघताना वाटेल की हे काहीतरी विचित्र आहे. कदाचित ते आपल्याला एखाद्या जुन्या हॉरर सिनेमाचं पोस्टर वाटेल! पण जेव्हा आपल्याला कळतं की हे चित्र काढणारा चित्रकार त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, स्वतच्या मृत्यूच्या जवळ जाऊन, स्वतचं आणि आपल्या कुटुंबाचं चित्र काढत होता, जेव्हा आपण या चित्रामधली लॅटिन भाषेतली ओळ समजून घेतो, तेव्हा हे चित्र हळूहळू उलगडत जायला लागतं.

या चित्राचं नाव आहे ‘अॅन अॅलेगरी ऑफ प्रुडन्स’ म्हणजे ‘शहाणपणाचं प्रतीकात्मक चित्र.’ इटलीच्या व्हेनिस शहरातल्या महान चित्रकार टिशिअन यानं, साधारण इ. स. 1550 ते 1565 या काळात हे चित्र रंगवलं. हे चित्र रंगवणारा चित्रकार टिशिअन हा त्या काळात ‘चित्रकारांचा राजा’ म्हणून ओळखला जायचा. राजे-महाराजे, पोप आणि मोठे व्यापारी त्याच्याकडून स्वतचं  पोर्ट्रेट बनवून घेण्यासाठी रांगेत उभं राहायचे.

टिशिअननं जेव्हा ‘अॅन अॅलेगरी ऑफ प्रुडन्स’ हे चित्र रंगवलं, तेव्हा तो आयुष्याच्या उत्तरार्धात होता. त्याचं वय साधारणपणे 70 ते 80 च्या दरम्यान असावं. आयुष्याचा एवढा मोठा टप्पा पार पाडल्यानंतर, स्वतचं आयुष्य, स्वतचं कुटुंब आणि जवळ येत असलेला मृत्यूचा काळ यांचा विचार करताना त्याच्या मनात जे विचार मंथन सुरू होते, त्यातूनच या चित्राचा जन्म झाला. असं म्हणतात की, त्यावेळी त्याला आपल्या अफाट संपत्तीची, चित्रांच्या कॉपीराईट्सची आणि कलात्मक वारशाची काळजी वाटू लागली. त्याला त्याचा मुलगा ओराझिओ आणि त्याचा पुतण्या मार्को वेसेलिओ यांच्यात आपल्या संपत्तीचं आणि कलेचं योग्य वाटप करायचं होतं. हा सगळं संदर्भ चित्र पाहताना उपयोगाचा ठरतो.

चित्रामध्ये सर्वात आधी आपलं लक्ष चित्राच्या मध्यभागी असलेल्या दाढीवाल्या माणसाच्या चेहऱयावर जातं. कारण तो थेट आपल्याकडे, म्हणजेच प्रेक्षकाकडे पाहतोय. डाव्या बाजूला एक वृद्ध माणूस डावीकडे पाहताना दिसतोय. तर दुसऱया बाजूला एक तरुण मुलगा उजवीकडे पाहतोय. या तीन मानवी चेहऱयांच्या खाली आपल्याला अनुक्रमे लांडगा, सिंह आणि कुत्रा यांचेही चेहरे दिसतात. अगदी बारकाईनं पाहिलं तर चित्राच्या वरच्या बाजूला अंधारात अतिशय धूसर अक्षरांमध्ये लॅटिन भाषेत एक वाक्य लिहिलेलं दिसतं. चित्ररचना अतिशय संतुलित आहे. तीन मानवी चेहरे आणि त्यांच्या बरोबर खाली तीन प्राण्यांचे चेहरे अशी सममितीय (Symmetrical) रचना चित्राला एका प्रकारची लय देते.

चित्रातले तीन मानवी चेहरे माणसाच्या आयुष्यातल्या तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धत्व या तीन टप्प्यांचं प्रतिनिधित्व करतात. हेच चेहरे एका अर्थानं टिशिअन स्वत (डावीकडे), त्याचा मुलगा ओराझिओ (मध्यभागी) आणि त्याचा पुतण्या मार्को वेचेल्लियो (उजवीकडे) यांचंही प्रतिनिधित्व करतात. या तीन चेहऱयांच्या वेगवेगळ्या दिशा पाहून तीन काळांची जाणीव होते. वृद्ध चेहरा डावीकडे पाहतोय. तो आपल्या भूतकाळाकडे पाहतोय असं वाटतं. मधला प्रौढ चेहरा थेट समोर पाहतोय. तो वर्तमानात जगतोय असं वाटतं. तर उजवीकडे पाहणारा तरुण चेहरा पाहून तो आपल्या भविष्याचं स्वप्न पाहतोय असं वाटतं.

टिशियननं मानवी चेहऱयांच्या खाली प्राण्यांचे चेहरे दाखवून प्राचीन इजिप्शियन आणि ग्रीक प्रतीकांचा अतिशय सुंदर वापर केलाय. वृद्ध मानवी चेहऱयाखाली लांडग्याचा चेहरा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सुचवतो. जशी लांडग्याची भूक कधी संपत नाही, तसंच भूतकाळातल्या गोष्टी, स्मृती आपला वेळ खात जातात. सिंह हा ताकदीचं, धैर्याचं आणि वर्तमानात निर्णय घेण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे. वर्तमानात जगण्यासाठी सिंहासारखे सामर्थ्य लागतं. त्यामुळे सिंहाचा चेहरा वर्तमानातल्या प्रौढ चेहऱयाखाली दाखवलाय. कुत्रा हा आशेचं, उत्सुकतेचं आणि भविष्याकडे पाहण्याच्या उत्साहाचं प्रतीक आहे. कुत्रा जसा मालकाच्या येण्याची आशेनं वाट पाहतो, तसा माणूस भविष्याकडे आशेनं पाहतो.

चित्राच्या वरच्या भागात अंधारात लॅटिन भाषेत एक वाक्य लिहिलंय, `EX PRAETERITO PRAESENS PRUDENTER AGIT, NE FUTURA ACTIONE DETURPET.` याचा सोपा मराठी अनुवाद असा होतो ः ‘कालच्या अनुभवातून शिकून, आज सावधपणे वागलं, तर उद्या बिघडणार नाही.’ टिशिअन एकाप्रकारे आपल्या मुलाला आणि पुतण्याला सांगतोय  ‘मुलांनो, मी जे शिकलो ते लक्षात ठेवा. भूतकाळाचे धडे घेऊन आजचा दिवस जगा, तरच उद्याचं आयुष्य चांगलं घडेल.’

अनुभवांचं महत्त्व सांगणारं हे चित्र साडेचारशे वर्षांनंतर आजही लोकप्रिय आहे. हे चित्र सध्या लंडनमधल्या नॅशनल गॅलरीत ठेवलेलं आहे.