
>> दिव्या सौदागर
बर्नआऊट सिंड्रोम ही ताणतणावामुळे येणारी मानसिक अवस्था विशेषत स्वभावाने अतिसंवेदनशील असणाऱ्या, परिपूर्णतेचा ध्यास असणाऱ्या व तशी इतरांकडून अपेक्षा असणाऱ्या व्यक्तींना भेडसावणारी ही समस्या आहे. जी समुपदेशनातून नक्कीच सावरता येते.
सीमा (नाव बदलले आहे) सकाळचे नऊ वाजून गेले तरी अजून अंथरूणातच होती. आई तिला हाका मारून मारून थकली होती आणि वैतागत किचनमध्ये तिचा ऑफिसचा डबा बनवायला गेली. “सीमा, आता मी पंखा बंद करीन हं’’ आईने निकराचं सांगितल्यावरही सीमा तशीच आळसावल्यासारखी होती. “अगं, उठ आता. साडेनऊला तू निघतेस.’’
गेल्या तीनेक महिन्यांपासून सीमाला ऑफिसचा भयंकर ‘नोशिया’ आल्यासारखं झालं होतं. “मी स्वतः सिलेक्ट केलेली कंपनी, मनासारखा जॉब, पगारही वाईट नाही, पण… मला हल्ली ऑफिसचा विषय जरी डोक्यात आला तरी डोकं गरगरायला लागतं. ऑफिसचा रस्ता दिसायला लागला तर आपसूकच डोळे ओले होतात. जड जड वाटायला लागतं. कशीतरी मी स्वतला बजावत तिथे पोहोचते.’’
सीमा समुपदेशनाला आल्यावर तिची समस्या सांगत होती. तिचं खाणं-पिणं आणि झोपेचं चक्र या तिच्या समस्यांमुळे अनियमित झालेलं होतं. त्यातच तिच्या मासिक पाळीचं चक्रही अनियमित होत असल्याने सीमा अजूनच ताणात होती. तिच्या समस्यांविषयी बोलताना कळलं की, एकप्रकारची नकारात्मकता तिला व्यापून गेली होती. त्यामुळे सीमाचा आत्मविश्वास तर गेलेला होताच शिवाय ‘मी काहीही करू शकत नाही’ हे कुठेतरी मनात बसून राहिलं होतं.
सीमाच्या या अवस्थेचं एक कारण म्हणजे तिच्या नोकरीमध्ये काही महिन्यांपासून बरेच बदल झालेले होते. त्यामुळे कामाचा एकंदर वाढता ताण तिला आला होताच, शिवाय वरिष्ठांबरोबर झालेल्या गैरसमजामुळे सीमाला ऑफिसमध्ये बरीच बोलणी, अपमान सहन करावा लागत होता जो तिला आता असह्य झालेला होता. तिच्या कार्यपद्धतीवर, क्षमतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे तिला तो अपमान असह्य झाला आणि ती ‘बर्नआऊट सिंड्रोम’ या अवस्थेत गेली.
आता बर्नआऊट सिंड्रोम सोप्या शब्दांत सांगायचा झाला तर नोकरीच्या ठिकाणी येणारा ताण, जो बराच काळ व्यक्ती अनुभवत असते. ज्यामुळे तिला स्वतबद्दल तसेच नोकरीबद्दल नकारात्मकता येते आणि ती ते ठिकाण टाळायचा प्रयत्न करते. ज्यामध्ये व्यक्तीला तिला देण्यात आलेले काम हे ओझे वाटायला लागते. ही अवस्था म्हणजे मानसिक आजार नाही (WHO च्या म्हणण्यानुसार) तर ती कामाच्या ठिकाणी असलेली मानसिक समस्या आहे, ज्यामध्ये समुपदेशनाच्या तसेच काही गंभीर केसेसमध्ये मानसोपचार उपलब्ध आहेत.
बर्नआऊट सिंड्रोम ही मानसिक अवस्था जशी नोकरीच्या ठिकाणी असलेल्या ताणामुळे होते ती सगळ्यांनाच अनुभवायला येते असं नाही. ज्या व्यक्ती स्वभावाने अतिसंवेदनशील असतात, ज्यांना परिपूर्णतेचा ध्यास असतो, त्या व्यक्तींना ही समस्या भेडसावू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं बघितलं गेलेलं आहे की, या व्यक्ती कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा एकटय़ाच असतात. इतरांशी असलेला दुरावा, एकलकोंडेपणा, कामात अति गढून जाणं, स्वतबद्दल कठोर असणं, बरेचसे अतार्किक विचार (माझी क्षमता दुसऱ्याने वाखाणली पाहिजेच नाहीतर मी कमी आहे, मी जर काम वेळेत पूर्ण नाही केलं तर मी जबाबदार व्यक्ती नाही, माझ्यासाठी माझं काम हीच माझी ओळख आहे) यामुळेही या व्यक्ती या अवस्थेत जाऊ शकतात.
सीमाने हे मान्य केलं की, ती बरीचशी भिडस्त स्वभावाची असल्याने तिच्याबद्दल टीममधल्या लोकांचे बरेच गैरसमज होते. तीही त्याकरिता कधीही पुढाकार घेऊन स्वतला इतरांमध्ये मिसळू देत नव्हती. कामामध्येच जास्त अडकत होती. कारण तिच्यावर घरूनच शिस्तीचे आणि कर्तव्यपालनाचे संस्कार झालेले होते. त्यामुळे तीही करीअर प्रथम मग बाकी सगळं या कोशात अडकल्याने ओव्हरटाईम, घरीही मेल्स ना उत्तर देत राहणं, सांगितलेल्या कामात परिपूर्ण राहायचा अट्टाहास यामुळे तिने मानसिक शांती गमावली होती. तिचा मेंदू सतत ऑफिसच्या (स्वतच्या) चिंतेत राहिल्यामुळे जास्त थकू लागला. त्यात तिने स्वतच स्वतच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतलं. काही काळानंतर या सगळय़ा ओझ्याने ती दाबली आणि ताणात गेली.
सीमासाठी समुपदेशनाचा पहिला टप्पा हा होता की, तिच्या अतार्किक आणि कठोर विचारप्रणालीवर काम करणं. कारण ती त्यामुळेच या अवस्थेत गेली होती. ऑफिस आणि काम म्हणजे आयुष्य नाही, तर तो आयुष्यातला एक भाग आहे हे तिच्या निदर्शनास आणलं गेलं. आयुष्यामध्ये वेळ हा महत्त्वाचा असतो जो स्वतच्या विश्रांतीसाठी वापरणं हे गरजेचं असतं आणि हे इंधनासारखं काम करतं हेही तिला पटवावं लागलं. ऑफिसच्या कामांतून थोडा ब्रेक, इतर छंदांमध्ये मन रमवणं, इतरांशी भावनिक संबंध दृढ करणं या गोष्टी तिला समजावल्या गेल्या.
हल्लीच्या वाढत्या नैराश्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये बर्नआऊटचा सामना करण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना आखल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये कर्मचारी सहाय्यक उपक्रमाद्वारे (EAP) समुपदेशन सेवा दिली जाते. तसंच व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद घडावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामाचा ताण येऊ नये म्हणून ‘ब्रेक्स’ ही संकल्पना अमलात आणली आहे, जिथे कामाच्या ठिकाणी थोडा विरंगुळा म्हणून कर्मचारी थोडा वेळ मेडिटेशन किंवा खेळूही शकतात.
सीमाला ‘ब्रेक घेणं’ म्हणजे स्वतला ‘चार्ज्ड’ करणं हे पटायला लागलं होतं. तशी ती स्वत थोडी मोकळी राहायला लागली. तिने इतर कर्मचाऱ्यांशी जाणीवपूर्वक संभाषण वाढवायला सुरुवात केली. त्यामुळे तिला तिच्या कंपनीत एक पाठिंबा, आधार तयार झाला. सहकाऱ्यांशी हितगुज केल्याने साहजिकच तिच्या विचारांमध्ये लवचिकता आली. तिने स्वतसाठी योगवर्ग लावला, जर्नालिन्ग करायला लागली. याचा फायदा तिला असा झाला की, त्यामुळे स्वतच्या अतार्किक विचारांशी सामना करायला तिला सोप्प गेलं. सीमा आता नव्या दृष्टिकोनातून तिच्या करीअरकडे बघायला शिकली.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
























































