
महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि पारंपरिक लोककला म्हणून लावणी हा नृत्य प्रकार ओळखला जातो. काळाच्या ओघात पारंपरिक संगीताऐवजी डीजेची साथ मिळाली आणि काही ठिकाणी कलेच्या नावाखाली अश्लील नृत्याकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे अश्लील डीजे लावणी आणि आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्यासाठी तमाशा, लावणी आदी कार्यक्रमांना राज्याच्या सेन्सॉर बोर्डाकडून ‘योग्यता’ प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडे तक्रार केली होती. लावणी व आक्षेपार्ह कार्यक्रमांना आळा घालण्याची मागणी यात केली होती. याची गंभीर दखल घेत रंगभूमी प्रयोग परीरक्षण मंडळाचे सचिव सं.पु. खामकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले आहे.
पारंपरिक वाद्यांचा वापर
सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणी लोककलेचा भाग असलेला लावणी कार्यक्रम करायचा असल्यास संबंधितांनी त्या लावणी कार्यक्रमाची संहिता, निवेदन, सारांश हा रंगभूमी मंडळ कार्यालयाकडे पूर्वनिरीक्षणासाठी सादर करून योग्यता प्रमाणपत्र घेणे नियमानुसार बंधनकारक केले आहे. लावणी कार्यक्रमात पारंपरिक वाद्याचा वापर करून कला सादर करणे अपेक्षित आहे.
यासाठी योग्यता प्रमाणपत्राची गरज
शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी सादर होणारे मनोरंजनाचे नाटक, एकांकिका, लोकनाटय़, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे या कार्यक्रमांच्या संहितेस निवेदनास रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे योग्यता प्रमाणपत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) असल्याची खातरजमा करूनच अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी, असे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या वतीने पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
…तर कारवाई होणार
प्रमाणित केलेल्या संहिता, निवेदन, सारांश, याव्यतिरिक्त अश्लील भाग निदर्शनास आल्यास किंवा तक्रारी आल्यास सबंधितांवर कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद केले आहे.




























































