उरणमधील सफाई कामगारांच्या 19 वारसांना हक्काच्या नोकऱ्या; दोन वर्षांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध कामगार संघटना तसेच महाविकास आघाडीच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून उरण नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या १९ वारसांना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. वारसा योजनेंतर्गत या नोकऱ्या मिळाल्या असून सर्वजण कामगार रुजूदेखील झाले आहेत. दीर्घ कालावधीनंतर सफाई कामगारांच्या वारसांना नोकऱ्या मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष सुरू होता. लातूरच्या एका कामगाराने संभाजीनगर न्यायालयाच्या खंडपीठासमोरही सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना वारसा हक्काने राज्यातील सर्वच सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानेही नगरपालिका प्रशासन संचालनाल यांना आदेश दिले होते.

नगराध्यक्षांनी घेतली दखल

या आदेशानंतर म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू होता. तसेच महाआघाडीचे नगरसेवक गणेश शिंदे, अतूल ठाकूर, प्रमिला पवार, मंगेश कासारे यांनीही सर्वसाधारण सभेत या विषयावर सभागृहात बाजू मांडली होती. त्यावेळी नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनीही यासंदर्भात गंभीर दखल घेऊन सर्व वारसांना सामावून घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला आहे.