
ग्रामीण भागातील मुलांनाही आता फाडफाड इंग्लिश बोलता येणार आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेने आपल्या १२२ शाळांमध्ये अत्याधुनिक इंग्रजी भाषा लॅब सुरू केली आहे. याद्वारे प्रत्येक मुलाला अचूक व्याकरणासह इंग्रजी भाषा शिकवली जाणार आहे. त्यामुळे इंग्लिशचा न्यूनगंड बाळगणारी गोरगरीब मुलेही न अडखळता अस्खलित इंग्रजी बोलू शकणार आहेत.
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, तंत्रज्ञानाधारित व स्पर्धात्मक करण्याच्या उद्देशाने एकूण १२२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी भाषा लॅब उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यापैकी जिल्हा परिषद अर्थसंकल्प २०२५-२६ नावीन्यपूर्ण योजनाअंतर्गत ६६ शाळांमध्ये तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५६ शाळांमध्ये इंग्रजी भाषा लॅब उभारण्यात आली असून त्यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा वरसोलीचा समावेश आहे.
आजच्या डिजिटल युगात इंग्रजी ही केवळ एक भाषा नसून उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार आणि जागतिक ज्ञानव्यवस्थेकडे नेणारी महत्त्वाची कौशल्यभाषा बनली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक भाषा शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा इंग्रजी भाषा लॅब उपक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, आकलन, संभाषण, उच्चार, शब्दसंपदा, आत्मविश्वास आणि डिजिटल शिक्षण कौशल्ये विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक भाषा शिक्षण सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
























































