महिला या राजकारणातल्या प्यादे नाहीत, भाजप महिला नेत्याच्या स्वपक्षीय नेत्याला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या आईबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी केलेल्या वक्तव्यावरून पक्षातच नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तामिळनाडू भाजपच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी नागेंद्रन यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत राजकारणासाठी महिलांना लक्ष्य करू नये, असे सुनावले आहे.

खुशबू सुंदर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत नागेंद्रन यांच्या वक्तव्याला “घृणास्पद” म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत करण्यात आलेली अशी टिप्पणी कोणत्याही व्यासपीठावर स्वीकारली जाऊ शकत नाही, असे म्हणत सुंदर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी ‘नारी शक्ती’बाबत बोलतात आणि महिलांना मोठा सन्मान देतात, असे खुशबू सुंदर यांनी म्हटले. त्यामुळे नागेंद्रन यांचे वक्तव्य राजकीय टीकेची मर्यादा ओलांडणारे आणि वैयक्तिक हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले.

“एखाद्या पक्षावर प्रश्न उपस्थित करा, जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवा, सरकार कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर टीका करा; मात्र तुमचा राजकीय मुद्दा मांडण्यासाठी कधीही महिलेचा वापर करू नका. महिला या राजकारणाच्या खेळातील प्यादे नाहीत,” असे सुंदर यांनी म्हटले. “तुम्ही या जगात एका महिलेमुळे आणि आईमुळे आहात. एका आईचा असा अपमान करणे वेदनादायक आणि त्रासदायक आहे,” असे सुंदर यांनी म्हटले.

विजय यांच्या वक्तव्यानंतर वादाला सुरुवात

या वादाची सुरुवात विजय यांनी डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर केलेल्या टीकेनंतर झाली. एप्रिल 2026 मध्ये झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमकेचा पराभव झाल्यानंतर विजय यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला होता. कोळाथूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर स्टॅलिन यांच्या “वडिलांचा” ठावठिकाणा कुठे आहे, असा संदर्भ विजय यांच्या वक्तव्यात असल्याचे सांगितले जाते.

यानंतर नैनार नागेंद्रन यांनी विजय यांच्या आईचा वैयक्तिक संदर्भ देत वादग्रस्त टिप्पणी केली. “वडील कोण आहेत, हे घरी आईला विचारून कळू शकते,” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

नागेंद्रन यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, वाढत्या टीकेनंतर नैनार नागेंद्रन यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या वक्तव्याचा राजकीय फायद्यासाठी चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा दावा त्यांनी केला. ‘ओरू नाडू 2.0’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा विपर्यास केला जात असल्याचे नागेंद्रन यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.
“राजकीय फायद्यासाठी माझ्या भाषणाचा विपर्यास आणि चुकीचा अर्थ लावणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मी कोणालाही लक्ष्य करून किंवा कोणताही चुकीचा हेतू ठेवून हे वक्तव्य केले नव्हते,” असे नागेंद्रन यांनी म्हटले.