
नाशिकमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे, आगामी कुंभमेळासाठी सुरू असलेल्या कामामुळे खोदलेले रस्ते यामध्ये नाशिककरांचे हाल सुरू असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी आहेत. नाशिककरांच्या समस्येवरून आवाज उठवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी नाशिक मध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते खासदार संजय राऊत करणार असून आज नाशिक मध्ये बोलताना ‘ ज्यांना शहरातील खड्डे बुजवता येत नाहीत ते कुंभमेळा घ्यायला निघाले आहेत ‘, असा सणसणीत टोला हाणला.
संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आतापर्यंत सात निष्पाप लोकांचे मृत्यू झाले आहेत. आणि इथले चंपतराय निर्लज्जपणे डोळ्यांनी पाहतात. 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. आणि हे शहर म्हणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. पंतप्रधान म्हणतात या देशाचे रस्ते आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीने बनवले आहेत. अनेक साधू संतांनी सांगितलं की नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाने लूट सुरू आहे. ज्यांना खड्डे बुजवता येत नाही, ते कुंभमेळा करायला निघालेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तसेच नाशिककरांसाठी आम्ही उद्या रस्त्यावर उतरतेय. हा मोर्चा म्हणजे सरकारचे वस्त्रहरण असणार आहे, अशी टीका करत, नाशिककरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
























































