
एसटी बसमधून प्रवास करत स्वच्छतेचा अधिभार म्हणून दोन रूपये घेतले जातात. मात्र रत्नागिरीच्या मुख्य बसस्थानकातील शहर विभागाच्या पुरूष स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय आहे.
एसटी महामंडळाने दोन रूपये स्वच्छता अधिभार लावल्याने तिकिट दरात वाढ झाली.आरक्षित तिकिट असेल तर सुट्टे दोन रूपये देताना प्रवासी आणि वाहक दोघांनाही प्रचंड त्रास होतो. मात्र स्वच्छता ही आवश्यक असल्याने प्रवाशांनी ही दरवाढ स्वीकारली. दोन रूपये अधिभार प्रत्येक तिकिटामागे घेतल्यानंतर बसस्थानकातील स्वच्छता सुधारली का? स्वच्छतागृहाची अवस्था काय आहे? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
रत्नागिरी बसस्थानकातील शहर विभागातील पुरूष स्वच्छता गृहातील वॉशबेसीन जवळच्या नळाच्या वरचे नॉब गायब झाले आहेत. त्यामुळे हातधुण्यासाठी पाणी कसे घेणार हा प्रश्न प्रवाशांना पडत आहे. दोन्ही वॉश बेसीनच्या नळाची अवस्था दयनीय झाली आहे. एकाचा तुकडा पडला तर दुसऱ्याचा हॅंडलचं गायब झाले आहे. स्वच्छता अधिभार घेणाऱ्या एसटी प्रशासनाने तात्काळ ही दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

























































