डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवायला गेले, आई-वडीलही खाली कोसळले; तिघांचा करूण अंत, छत्रपती संभाजीनगरातील थरकाप उडवणारी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगरमधून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलगा, वडील आणि आई अशा एकाच कुटुंबातील तिघांचा वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 11 वाजता धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या खवड्या डोंगरावर ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. सातारा देवळाई परिसरातील 18 वर्षीय कुणाल मुरलीधर चंदवडे हा तरुण कौटुंबिक वादातून शुक्रवारी सकाळी 8 वाजता स्वत:चे जीवन संपवण्याच्या उद्देशाने धुळे-सोलापूर महामार्गालगतच्या खवड्या डोंगरावर चढला होता. मुलगा टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता यांनी तातडीने डोंगरावर धाव घेतली.

या प्रकारची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षा जाळेही पसरले होते. मात्र, मुलगा वारंवार आपली जागा बदलत असल्याने बचावकार्य अत्यंतिक कठीण झाले होते.

डोंगराच्या धोकादायक कड्यावर उभ्या असलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी आई हात जोडून विनवण्या करत होती, तर वडील त्याचा आक्रोश करत मनधरणी करत होते. तब्बल तीन तास आई-वडिलांची ही धडपड सुरू होती. मात्र, सकाळी 11 वाजताच्या सुमारास कुणालने अचानक खोल खदाणीत उडी घेतली. मुलाला खाली कोसळताना पाहताच त्याला वाचवण्याच्या आकांताने धावलेले आई-वडीलही तोल जाऊन कड्यावरून खाली कोसळले. महाकाय दगडांवर आदळल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलीस व स्थानिक नागरिकांनी तातडीने खदाणीत उतरून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. कौटुंबिक वादातून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, पुढील तपास सुरू आहे.

‘खवड्या डोंगर’ पुन्हा चर्चेत
धुळे-सोलापूर महामार्गालगतचा खवड्या डोंगर परिसर उंच कडे आणि खोल दगडी खदाणींमुळे अत्यंत धोकादायक मानला जातो. या परिसरात यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा धोकादायक कड्यांच्या ठिकाणी सुरक्षा कठडे, संरक्षक जाळ्या बसवण्याची मागणी नागरिकांमधून पुन्हा एकदा तीव्रतेने केली जात आहे.